अलिबाग : उसने घेतलेले पैसे परत न केल्याच्या रागातून अलिबाग तालुक्यातील कार्ले गावातील गिरीश कृष्णा पाटील (४४) याला केलेल्या मारहाणीत त्याचा मत्यू झाला. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
गिरीश कृष्णा पाटील (४४) असे या मृत व्यक्तीचे नाव असून, तो कार्ले गावचा रहिवासी आहे. गिरीशने पोयनाड येथील राजश्री जयस्वाल यांच्याकडून वीस हजार रुपये उसने घेतले होते. ही रक्कम परत न दिल्याने त्याचा राग धरून जयस्वाल यांच्यासह चौघेजण २९ जून रोजी सायंकाळी पाटील यांच्या घरात घुसले. त्यावेळी झालेल्या वादात आरोपींनी गिरीश पाटील यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर गावातील पाटील आळीत जाणाऱ्या रस्त्यावर पुलाच्या बाजुला सदानंद पाटील यांच्या घरासमोर आणून पाटील यांच्या डोक्यावर विटेने हल्ला करून गंभीर जखमी केले.
यामध्ये गिरीश पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी जयश्री जयस्वाल, योगेश मोहटे, योगेश सहाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे.
या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचा देखील सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे करीत आहेत.