महाड रायगड मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद
महाड : महाड तालुक्यात गेल्या २४ तासापासून तुफानी पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाड तालुक्यातील काळ, सावित्री व गांधारी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून मांडले नदीचे पाणी वाढल्याने महाड रायगड मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद झाला आहे. या रस्त्याला पर्यायी असणारा मोहोप्रे आचळोली मार्ग हा लांबीचा पडत असल्याने काही वाहन चालक आपला जीव धोक्यात घालून आपली वाहने या पाण्यातून नेत आहे. अशा धाडसात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
महाड तालुक्यात शुक्रवारी सायंकाळ पासून तुफानी पाऊस सुरु असून गेल्या २४ तासात महाड तालुक्यात ११५ मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत तालुक्यात १०४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सकाळ पासून पावसाचा जोर वाढला असून सायंकाळ पर्यंत हा जोर कायम असून आणखी ४ ते ५ तास पावसाचा जोर असाच कायम राहीला तर महाड शहरासह तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
महाड रायगड मार्गावरील लाडवली पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असून या पुलाजवळून काढलेल्या पर्यायी मार्गावरून शुक्रवारी सायंकाळनंतर पाणी जाऊ लागल्याने हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद पडला आहे. या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून मोहोप्रे आचळोली मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. परंतु काही वाहनचालक हा लांबचा फेरा वाचवण्यासाठी आपली वाहने लाडवली पुलाजवळील पर्यायी मार्गावरील पाण्यातून नेत आहेत. आज दुपारी अशाच रितीने आपली दुचाकी पाण्यातून नेताना दोघे दुचाकीस्वार थोडक्यात बचावले आहेत.