Sunday, June 22, 2025

Earthquake : भूकंपाने मराठवाडा-विदर्भ हादरला!

Earthquake : भूकंपाने मराठवाडा-विदर्भ हादरला!

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


नांदेड : मराठवाड्यातील (Marathwada) नागरिकांना उन्हाळ्यासह ऐन पावसाळ्यातही पाणीबाणीसारख्या (Water Shortage) समस्यांना सामोरे जावे लागले होते. भीषण पाणीटंचाईमुळे (Water Crisis) मराठवाड्यातील नागरिकांचा जीव टांगणीला आला होता. काही दिवसांपासून या समस्यांपासून नागरिकांना दिलासा मिळत असताना आता पुन्हा मोठा धक्का सहन करावा लागत आहे. आज मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एक जिल्ह्यात भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले आहेत. या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही धरणीकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सव्वा सात वाजेच्या दरम्यान नांदेड (Nanded), हिंगोली, परभणी जिल्ह्यातील काही ठिकाणी तर विदर्भातील वाशीममध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी असून भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून १३ किमीवरील दांडेगाव परिसरात असल्याची माहिती मिळत आहे.



'या' भागात भूकंपाचा धक्का



  • परभणी जिल्ह्यातील सेलू, गंगाखेड आदी भागात भुकंपाचा हा धक्का जाणवला आहे.

  • मराठवाड्यालगत असलेल्या वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. जयपूर, टनका, सोंडा, सावळी कृष्णा या गावातील लोकांच्या घरावरील टीन पत्राचा मोठा आवाज झाला. त्यामुळे गोठ्यात बांधलेल अनेक जनावरे देखील भयभीत होऊन बाहेर पडण्यासाठी धडपडत होते

  • मराठवाड्यातील नांदेड तसेच जालना जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के बसले आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.


दरम्यान, २ महिन्यांपूर्वीही या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीत गूढ आवाज येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या भूकंपाच्या धक्क्यासंदर्भात अद्याप प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >