धरणीची होता लाही, तू शिंपतो मायेचे पाणी
चिंब चिंब भिजताना, मुले गातात तुझी गाणी
हिख्या हिरव्या शेताने, पाखरांना फुटते वाणी
तू रिमझिम बरसताना, डोलतात झाडे अवनी
श्रावणात सण बहरता, शृंगारात सजते सजणी
मेघातून येता जलधारा, पापणीतले संपते पाणी
तू सरसरत येताना, करतोस आनंदाची पेरणी
तू यावे असेच भेटाया, जीवलगा तू या जीवनी
– स्वाती गावडे, ठाणे
पहिला पाऊस
बदाबदा किती…
कोसळतोय तू…
भिजवित सुटला चिंबचिंब
सारा आसमंत तू…!!
सृष्टी भिजली सारी…
हरित तृनही शहारले…
डोंगर दर्यातूनही पाहा
झरे नाले प्रसवले…!!
हिरव्या रानी गर्द शिवांरी,
झरझर नाले ओथंबले…
लाल, पिवळ्या, हिरव्या
पानांवर मोती विसावले…!!
किमया मोठीच न्यारी,
सर्वत्र आनंदून बहरले,
रंगबिरंगी इंद्रधनुचे तोरण
नभोमंडपी सजले…!!
ऊन पावसाच्या सरी
लपंडाव सुरू झाले..
तुझ्या येण्याने पाहा
बालचमुही खेळात रंगले…!!