
बीड : पंकजा मुंडेंचा राजकीय विश्वासघात, धनंजय मुंडेंची गाडी फोडण्याचा कट आणि मनोज जरांगे यांच्याबद्दल एकेरी वक्तव्याच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे वादग्रस्त ठरलेला शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेवर (Kundlik Khande) कायद्याचा फास आता आवळला जात आहे.
दोन दिवसांपूर्वी कुंडलिक खांडे यांची कथित ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पक्ष विरोधी कारवाया केल्याने शिवसेना बीड जिल्हाप्रमुख पदावरून कुंडलिक खांडे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. या संदर्भात शिवसेना सचिव संजय मोरे यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे.
खांडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या क्लिपमधील पंकजा मुंडेंना कशी मदत केली नाही. धनंजय मुंडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याच्या संदर्भातील संवाद आहे. या प्रकरणी कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र, त्यांच्यावर काही महिन्यापूर्वी ३०७ चा गुन्हा देखील दाखल झाला होता. याच गुन्ह्यात खांडे यांना अटक झाली आहे. खांडे यांना बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे. आपल्याच पक्षाच्या उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणातील आरोपी कुंडलिक खांडेला बीडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. बीड शहरातील जालना रोडवर असलेले खांडे यांचे कार्यालय जमावाने दगडफेक करुन तोडले होते. त्यानंतर आता शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार, शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून पक्ष विरोधी कार्य केल्याबद्दल बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे यांची शिवसेना पक्षातून हक्कालपट्टी करण्यात येत असल्याचे पत्रकात स्पष्ट म्हटले आहे.
कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कबुली कुंडलिक खांडे देत आहेत. तसेच या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याची भाषा करत आहेत. निवडणूक निकालापूर्वी झालेल्या या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली.