Friday, May 9, 2025

रिलॅक्ससाप्ताहिक

Anushka Borhade : जमीन विकायची नसते, कसायची असते

Anushka Borhade : जमीन विकायची नसते, कसायची असते

टर्निंग पॉइंट - युवराज अवसरमल 


भूमिकन्या-साद घालते निसर्गराजा’ ही शेती, शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित मालिका सध्या सोनी वाहिनीवर पाहायला मिळत आहे. या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसणारी अभिनेत्री सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ती अभिनेत्री म्हणजे अनुष्का बोऱ्हाडे.


तिचे शालेय शिक्षण घणसोलीच्या शेतकी शाळेत झाले. ती स्पोर्ट्समध्ये होती. कबड्डी खेळायची. कोपर खैरणेच्या ज्ञानविकास कॉलेजमधून तिने बी. कॉम. केले. ठाण्याच्या कलामंथन संस्थेशी ती जोडली गेली. या संस्थेमार्फत तिने एक एकांकिका केली होती. त्याचे नंतर नाटकात रूपांतर करण्यात आले. त्या नाटकाचे नाव होते ‘तहान.’ शेतकरी आत्महत्या व पाण्याची समस्या त्यात मांडली होती. त्यानंतर तिने वर्षभर ‘करून गेलो गाव’ हे व्यावसायिक नाटक केले. ते मालवणी नाटक होते. राजकारणावर भाष्य करणारे नाटक होते. त्यानंतर तिने ‘मॅड सखाराम’ हे नाटक केले. त्यातील भूमिकेसाठी तिला झी नाट्य गौरवचा उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी नामांकन मिळाले होते.


‘भूमिकन्या-साद घालते निसर्गराजा’ ही तिची नवीन मालिका आहे. या मालिकेमध्ये लक्ष्मी नावाची व्यक्तिरेखा ती साकारत आहे. ती बी. एस्सी.अग्रिकल्चर करते. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत, ती आली आहे. शेतीवर तिचा खूप जीव आहे. आई-वडिलांसोबत ती शेतात काम करते. तिला संपूर्ण गावाची शेती हिरवीगार झालेली पाहायची आहे. ती खोडकर, प्रत्येक गोष्टीत रमणारी, स्वाभिमानी मुलगी आहे. या मालिकेचे शूटिंग पुण्यातील मंचर, मुंबईतील घोडबंदर येथे केले गेले. या मालिकेचे दिग्दर्शक शांत प्रवृत्तीचे असून, कलाकारांकडून चांगल्या प्रकारे काम ते काढून घेतात, असे
ती मानते.


शेतामध्ये फार्म हाऊस बांधून, लोक शेतीतील हिरवेपणा नाहीसा करतात. शेत जमीन विकता विकता एक दिवस विकायला जमीनच उरणार नाही, अशी खंत तिने व्यक्त केली. लॉकडाऊनमध्ये जवळ जवळ सर्व उद्योगधंदे बंद झाले होते, पण शेती करणे बंद झाले नव्हते. शेती करणे बंद झाले तर खाणार काय? असा प्रश्न तिने उपस्थित केला. सेंद्रिय शेती करणे महत्त्वाचे आहे. शेतकरी जगला पाहिजे. शेती विकायची नसते, कसायची असते असे ती मानते. या मालिकेमुळे शहरी भागातील प्रेक्षकांना निदान शेतकऱ्यांच्या घरातील परिस्थितीचे अवलोकन होईल. ही मालिका सोनी वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Comments
Add Comment