
मुंबई : पुणे पोर्शेकार अपघात प्रकरण आज विधानसभेत गाजले. याबाबतची लक्षवेधी विरोधी पक्षाच्यावतीने विधानसभेत मांडण्यात आली. पब्ज आणि बारच्या मॅनेजरसह इतरांवरही गुन्हा दाखल झाला आहे, चौकशी न करता त्यांनी लिकर सर्व्ह केल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटकही केली. त्या आरोपीचे आजोबा यांच्यावरही अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना झाल्यानंतर वरिष्ठांना कळवले नाही, त्यामुळे संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, पुण्यातील ७० पबवरती कारवाई करुन लायसन्स रद्द करण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत माहिती दिली. दरम्यान यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
बारमध्ये येणाऱ्यांचे वय तपासायलाही सुरुवात झाली आहे. ज्यांचे लायसन्स आहेत, त्यांच्याठिकाणी कॅमेरे लावले आहेत. जर वय कमी असताना त्याला दारू सर्व्ह केली, तर लायसन्स रद्द आणि फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही फडणवीसांनी थेट सभागृहातून दिला आहे. पुणे पोर्शे कार अपघाताची घटना घडली, तेव्हा या आरोपाला मारहाणही करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सुरुवातीला ३०४ ‘अ’ अंतर्गत हा गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्याच दिवशी ३०४ चा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या दिवशीजी बाजू मांडली ती माझ्याकडे आहे. याप्रकरणात पोलिसांनी तात्काळ अपील दाखल केले. तसेच, आरोपीच्या रक्ताचा नमुना घेतला. तो त्याच्या वडिलांशी देखील मॅच करण्यात आला. मात्र, तो मॅच होत नव्हता. त्यामुळे, पोलिसांनी तपासाअंती डॉक्टरांना अटक केली. त्यात ३ लाख रुपये एकाने घेतल्याचे कबुल करण्यात आले आहे. आरोपी पहिल्या आणि दुसऱ्या बारमध्ये बसला होता, त्याचे बिल आणि सीसीटीव्ही पोलिसांनी जप्त केले आहे. याशिवाय आरोपीच्या वडिलांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली.
कायद्याचे राज्य राहिले नाही, पोर्शे कार अपघातातील कारला ६ महिन्यांपासून नंबर प्लेट नव्हती, तरीही कार रोडवर धावत होती. त्यामध्ये काही राजकीय कारण आहे का, याचा तपास केला पाहिजे. तसेच, रक्त सँपल बदलण्यात आले होते, पुण्यात ४५० ओपन टेरेस हॉटेल्स आहेत. पोलिसांसाठी ५ लाखांचा हप्ता बांधला गेल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. तर, लहान हॉटेल्ससाठी अडीच लाख रुपयांचा हप्ता आहे. पुण्यात गुंडांची परेड घेतली की ओळख करून दिली, असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
पोलिसांकडून दोन चुका झाल्या : फडणवीस
श्रीमंत-गरिबाला समान न्याय दिला पाहिजे, ससून रुग्णालयात झालेल्या प्रकारामुळे न्यायाला दाबण्याचा प्रयत्न झाला. माध्यमे आणि लोकांनी ओरड केली म्हणून कारवाई केली असे नाही. तर, दहा वाजता गुन्हा दाखल केल्याबद्दल जे झाले त्याची संपूर्ण नोंद पोलीस डायरीत आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली. रात्री साडेआठ वाजता गुन्हा दाखल केल्यानंतर मेडिकलला पाठवणे आणि वरिष्ठांना न सांगता गुन्हा दाखल करणे या दोन चुका पोलिसांकडून झाल्या, असे फडणवीसांनी सभागृहात मान्य केले.