
जाणून घ्या नेमका झिका आला कोठून व त्याची लक्षणे
पुणे : देशभरात पसरलेला कोरोना व्हायरस (Corona Virus) काहीसा नष्ट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र ऐन पावसाळ्यात डेंग्यू (Dengue), मलेरिया, चिकनगुनिया अशा अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. सध्या अनेक राज्यांत डेंग्यूने थैमान घातले आहे. अशा वातावरणात एका नव्या व्हायरसने देखील सर्वांना चिंतेत टाकले आहे. पुण्यात 'झिका' (Zika virus) व्हायरसमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या कोथरुड एरंडवणे भागात दोघांना झिकाचा प्रादुर्भाव झाला होता. आता त्यात आणखी एका रुग्णाची भर पडल्याने पुणेकरांची धाकधूक वाढल्याचे दिसून येत आहे. परंतु नेमका हा झिका व्हायरस आला कुठून आणि याची लक्षणे कोणती आहेत? जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.
झिका आला कुठून
झिका हा आफ्रिका, आग्नेय आशिया, अमेरिका या ठिकाणी आढळतो. पण झिकाचा संसर्ग झालेल्या लोकांनी प्रवास केला नसून त्यांना या व्हायरसची लागण कशी झाली हा प्रश्न निर्माण होतो.
झिका व्हायरस एडिस इजिप्ती डासांपासून होतो. रुग्णांच्या लैंगिक संबंधातूनही या व्हायरसची लागण होते. यापूर्वी पुण्यात जेव्हा कोणत्याही व्हायरलचे रुग्ण आढळले तेव्हा त्यांनी कोठे ना कोठे प्रवास केला होता किंवा संपर्कात आले होते. या व्हायरसचे मूळ सापडले नाही तर हा इतरांनाही होऊ शकतो आणि त्याचे रुग्ण वाढू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे.
झिका नेमका काय आहे?
झिका हा फ्लॅविव्हायरस वंशातील विषाणू आहे. युगांडामधील झिका जंगलातून हा विषाणू सर्वात पहिल्यांदा १९४७ मध्ये वेगळा करण्यात आला होता. त्यावरून त्याला 'झिका' हे नाव पडले आहे.
१९५० च्या दशकापासून आफ्रिकेतून आशियापर्यंतच्या पट्ट्यात विषाणूचा प्रभाव आढळून आला. २००७ ते २०१६ पर्यंत हा विषाणू पूर्वेकडे, प्रशांत महासागर ओलांडून अमेरिकेपर्यंत पसरला.
झिका व्हायरसची चिन्हे आणि लक्षणे
झिका व्हायरसची लक्षणे डेंग्यूसारखी आहेत. डास चावल्यानंतर ३ ते १४ दिवसांनी लक्षणे दिसतात आणि त्यात पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो.
- कमी दर्जाचा ताप
- त्वचेवर पुरळ
- डोकेदुखी
- स्नायू आणि सांधेदुखी
- डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह (लाल डोळा)
- पोटदुखी