रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी दानशूर कै. भागोजीशेठ कीर यांनी बांधलेले श्री भागेश्वर मंदिर असून, मंदिरातील कलाकुसर प्रेक्षणीय आहे. गाभाऱ्यात शंकराची पिंड आहे. मंदिराचे बांधकाम स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुनाच आहे.
कोकणी बाणा – सतीश पाटणकर
रत्नागिरी तालुका धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. लोकमान्य टिळकांची जन्मभूमी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी असलेल्या या परिसरात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी किमान दोन दिवस तरी हवेतच. दोन किलोमीटरच्या अंतरात पांढऱ्या आणि काळ्या समुद्राच्या रूपाने सृष्टीचा सुंदर अाविष्कार इथे पाहायला मिळतो. रत्नागिरीच्या मुक्कामात अत्यंत रुचकर कोकणी भोजनाची चव चाखता येते. मुंबई-रत्नागिरी हा कोकण रेल्वेचा प्रवासही तेवढाच आनंद देणारा आहे. रेल्वे मार्गाने येताना सह्याद्रीच्या कुशीतील सृष्टीसौंदर्य पाहता येते. रत्नागिरी रेल्वेस्थानक मुख्य शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईहून वाहनाने यायचे झाल्यास, मुंबई-गोवा महामार्ग हा एकमेव मार्ग आहे. मुंबई-रत्नागिरी अंतर ३४० किलोमीटर आहे, तर पुणे-रत्नागिरी अंतर ३२० किलोमीटर आहे. पुण्याहून कुंभार्ली घाटातून किंवा कराड-मलकापूरमार्गे रत्नागिरीला पोहोचता येते.
रत्नागिरी शहराच्या पश्चिम टोकाला असलेल्या डोंगरावर रत्नदुर्ग किल्ला आहे. या किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून, त्याला तीन टोकं आहेत. हा किल्ला शिलाहारकालीन असावा, असे काही इतिहासकारांचे मत आहे. १२०५च्या सुमारास राजा भोजाने याची निर्मिती केली असे म्हटले जाते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १२० एकर असून एका बाजूला पेठ किल्ला, दुसऱ्या बाजूला दीपस्तंभ असलेला डोंगर आणि तिसऱ्या टोकाला २०० फूट उंचीच्या डोंगरावर असलेला बालेकिल्ला असे रत्नदुर्गाचे स्वरूप आहे. पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरलेला समुद्रकिनाऱ्यावरील रत्नदुर्ग किल्ला हा ‘भगवती किल्ला’ या नावानेही ओळखला जातो. किल्ला बाराव्या शतकात बांधला गेल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
रत्नागिरी शहराच्या पश्चिम बाजूस एक किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला बालेकिल्ला आणि पेठ किल्ला अशा दोन भागांत आहे. रत्नदुर्गाची बांधणी बहमनी काळात झाली. शिवाजी महाराजांनी किल्ला आदिलशहाकडून १६७० साली जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी १७९० साली किल्ल्याची डागडुजी करून, त्याला लष्करीदृष्ट्या मजबुती आणली. छत्रपती संभाजी राज्यांनी रत्नदुर्गास भेट दिली होती. करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात असलेला रत्नदुर्ग पुढे आंग्रे घराण्याच्या ताब्यात होता. पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने रत्नदुर्गावर ताबा मिळवला. पुढे तो किल्ला १८१८ मध्ये पंतप्रतिनिधींकडून इंग्रजांच्या ताब्यात गेला. बालेकिल्ल्यात भगवतीदेवीचे सुंदर मंदिर आहे. किल्ल्याच्या दक्षिणेकडे दीपस्तंभ आहे. बालेकिल्ल्याभोवती नऊ बुरुज असून, संपूर्ण किल्ल्यास २९ बुरुज आहेत. किल्ल्याचा आकार घोड्याच्या खुरासारखा दिसतो. किल्ला सुमारे १,२११ मीटर लांब आणि ९१७ मीटर रुंद असून संपूर्ण परिसर १२० एकराचा आहे. तीनही बाजूला समुद्र व किल्ल्याच्या एका बाजूला असलेले दीपगृह यामुळे पर्यटक येथे आकर्षित होतात.
बालेकिल्ल्यावरून अथांग समुद्राचे दर्शन घडते. रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी दानशूर कै. भागोजीशेठ कीर यांनी बांधलेले श्री भागेश्वर मंदिर असून, मंदिरातील कलाकुसर प्रेक्षणीय आहे. गाभाऱ्यात शंकराची पिंड असून, मंदिराचा सभामंडप भव्य आहे. या मंदिराच्या खांबांवर सुंदर निसर्गचित्रे कोरलेली असून, मंदिराच्या छतावर ध्यानस्थ साधूंचे पुतळे बसविले आहेत. मंदिराचे बांधकाम स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुनाच आहे. परिसरातील रम्य वातावरणामुळे मंदिराचे सौंदर्य खुलून दिसते. मंदिर परिसरात भक्तनिवासाची सुविधा आहे.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)