केडीएमसीच्या पर्यावरण प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांचे प्रतिपादन
कल्याण : यावर्षी संपन्न होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मूर्तीकरांनी केवळ शाडूच्याच श्रीगणेशमूर्ती (Ganesh idol) तयार कराव्यात असे स्पष्ट प्रतिपादन महापालिकेच्या पर्यावरण प्रदूषण (Environment Pollution) नियंत्रण विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी केले. केंद्रीय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली यांच्याकडील सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती (Plaster of Paris) उत्पादनावर बंदी घालण्यात आलेली आहे, या पार्श्वभूमीवर कल्याणच्या आचार्य अत्रे रंग मंदिरात कारखानदार व मूर्ती विक्रेते यांचे समवेत पार पडलेल्या बैठकीत उपायुक्त अतुल पाटील यांनी हे स्पष्ट प्रतिपादन केले.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मूर्ती बनवणारे कारागीर, मूर्तिकार व उत्पादक यांना पीओपी पासून मूर्ती तयार करण्यावर बंदी घालण्याचे आवाहन यापूर्वीही महापालिकेमार्फत करण्यात आले होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनानुसार महापालिका कार्यक्षेत्रात केवळ पर्यावरण मूर्तींचे उत्पादन व विक्री करण्यास मान्यता देण्याबाबत कळविले असल्याची असल्याची माहिती या बैठकीत उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली.
या बैठकीत उपस्थित कारागीर/ मूर्तिकारांना त्यांनी केवळ पर्यावरणपूरक मातीच्या व नैसर्गिक रंग वापरून पाण्यात सहज विरघळणाऱ्या मातीच्या मूर्तींची निर्मिती व विक्री करणे बाबत सक्त सूचना देण्यात आल्या. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनानुसार महापालिका क्षेत्रात मूर्ती बनविणे अथवा विक्री करण्यासाठी महानगरपालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणी न केलेले कारागीर मूर्तिकार व उत्पादक यांना महानगरपालिका क्षेत्रात मूर्ती विक्री स्टॉलला महापालिकेमार्फत परवानगी देण्यात येणार नाही असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
प्रत्येक प्रभागात उपलब्ध असलेल्या जागेनुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार केवळ पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना आवश्यक पुरेशी शाडू माती आणि जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन उपायुक्त अतुल पाटील यांनी या बैठकीत दिले. या बैठकीस उपस्थित असलेले कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे, पर्यावरण कार्यकर्ता रोहित जोशी, मनूसृष्टी पर्यावरण कन्सल्टन्सीच्या वैशाली तांबट यांनी पीओपीच्या मूर्तीमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानी बाबतची, जलप्रदूषणाबाबतची माहिती उपस्थितांसमोर सादर केली.