बाजारपेठांमध्ये बसविण्यात येणार एक हजार सीसीटीव्ही
अलिबाग : नागरिकांच्या सुरक्षेसाठी रायगड पोलिसांकडून (Raigad Police) लवकरच ‘एक कॅमेरा सुरक्षा’ (one camera security) ही संकल्पना रायगड पोलीस हद्दीत राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत रायगड पोलीस विभागातील प्रमुख बाजार पेठांमधील दुकानदारांना त्यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी (CCTV Camera) एक कॅमेरा रस्त्यांच्या दिशेने ठेवण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरील चोरीचे प्रकार, महिलांच्या सुरक्षेवर नजर राहू शकणार आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार कॅमेरे कार्यान्वित करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली.
वाढलेले औद्योगिकीकरण आणि तिसऱ्या मुंबईमुळे रायगड जिल्ह्याचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय आणि पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकाची रेलचेल वाढली आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सक्षम सुरक्षा निर्माण करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. शिवाय वाहतूक व्यवस्था राखतानाही, पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या समस्यांवर उपाययोजना करताना सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वाची ठरते. त्यामुळेच रायगड पोलिसांतर्फे लवकरच ‘एक कॅमेरा सुरक्षेसाठी’ ही संकल्पना संपूर्ण रायगड पोलीस क्षेत्रातील शहर भागातील बाजारपेठांमध्ये राबविली जाणार आहे. या संकल्पनेनुसार रायगड पोलीस विभागातील प्रमुख बाजारपेठांमधील दुकानदारांना त्यांच्याकडील सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षेसाठी उपयोगात आणले जाणार आहेत.
दुकानातील एक कॅमेरा रस्त्याच्या दिशेने ठेवण्याच्या सूचना प्रकार दुकानदारांना करण्यात येणार आहेत. यामुळे बाजारपेठांमधील महिलांची सुरक्षा, मुलींची छेडछाड, चोरी यांच्यावर आळा बसणार आहे. शिवाय वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासही मदत होणार आहे. दुकानदारांकडे असलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांपैकी एक कॅमेरा रस्त्याच्या दिशेने ठेवण्याचे आवाहन दुकानदारांना करण्यात येणार आहे. दुकानदारांसाठी सक्तीचे नसले, तरी सर्वांच्या सुरक्षेसाठी दुकानदारांना पोलीस विभागातर्फे आवाहन केले जाणार आहे, अशीही माहिती घार्गे यांनी दिली.
रायगड पोलीस विभागात पहिल्या टप्प्यात एक हजार कॅमेरे कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. कॅमेऱ्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पुढील टप्प्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे वाढविले जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेत दुकानदारांचाही सहभाग वाढणार आहे. हे सक्तीचे नसले तरी दुकानदारांना आवाहन करण्यात येणार आहे. सुरक्षेची जबाबदारी पोलिसांसह नागरिक आणि दुकानदारांचीही आहे. ‘एक कॅमेरा सुरक्षेसाठी’ ही संकल्पनेमुळे दुकानदारही पोलीस सुरक्षेत भर घालतील, असा विश्वास घार्गे यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे हेही उपस्थित होते.