पाहा तुमचे खाते तर नाही ना यात?
मुंबई : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक बँकांवर आरबीआय (RBI) कारवाई करत असते. तसेच ज्या बँका आर्थिक डबघाईला (Financial crisis) आलेल्या असतात, अशा बँकांसंदर्भात देखील आरबीआय महत्त्वाची पावले उचलत असते. काही दिवसांपूर्वीच आरबीआयने दोन सरकारी बँकांना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दणका बसवला होता. त्यानंतर आता पुन्हा आणखी एका सहकारी बँकेवर आरबीआयने मोठी कारवाई केली आहे. (RBI Action)
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील पूर्वांचल को-ऑपरेटिव्ह बँकेवर (Purvanchal Co-Operative Bank) आरबीआयने पुन्हा कारवाई केली आहे. या बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नाही. बँकेला बँकिंग व्यवसाय पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सर्वसामान्यांचे नुकसान होऊ शकते, असे आरबीआयने म्हटले आहे. त्यामुळे आरबीआयकडून या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
ठेवीदारांच्या ठेवी परत मिळणार
पूर्वांचल को-ऑपरेटिव्ह बँकेत ठेवी असणाऱ्या प्रत्येक ठेवीदाराला त्याची ठेव रक्कम ५ लाखांपर्यंत डिपॉझिट इन्शुरन्स आणि लोन गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून मिळण्याचा अधिकार असणार आहे. बँकेच्या आकडेवारीनुसार, सुमारे ९९.५१ टक्के ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण ठेवी मिळणार आहे. त्याचबरोबर सहकारी बँक सध्याच्या आर्थिक स्थितीसह त्यांच्या ठेवीदारांना पूर्ण देय देण्यास सक्षम नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
या खासगी बँकांवरही ठोठावला दंड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर कडक कारवाई केली होती. आरबीआयने या बँकांवर कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला होता. येस बँक आणि आयसीआयसीआय बँक मध्यवर्ती बँकेच्या अनेक नियमांचे उल्लंघन करत आहेत. यामुळे येस बँकेला ९१ लाख रुपये आणि आयसीआयसीआय बँकेला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सध्या आरबीआयने या दोन्ही बँकांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे.