
शालेय शिक्षण विभागाने दिली 'ही' महत्त्वाची माहिती
मुंबई : राज्यात २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षापासून ‘एक राज्य एक गणवेश’ अशा योजनेची (One State One Uniform Scheme) अंमलबजावणी करण्यात आली आहे. याअंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एक नियमित स्वरूपाचा गणवेश तर स्काऊट व गाईड या विषयासाठी दुसरा गणवेश असणार आहे.
मागील काही वर्षांपासून राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये गणवेशाचे कापड व शिलाई करून विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्यात येत होते. या प्रक्रियेमध्ये गणवेशाच्या रंगसंगतीमध्ये एकसमानता नसून शालेय समिती व मुख्याध्यापकांना कापडाच्या दर्जाबाबत परिपूर्ण माहिती नसल्याने बऱ्याचदा कमी दर्जाचे कापड प्राप्त होणे अशा त्रुटी आढळून आल्या होत्या. या बाबींचा विचार करून शासनाकडून 'एक राज्य एक गणवेश' योजना राबविण्यात येत आहे.
४४ लाख ६० हजार ४ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश
शालेय शिक्षण विभागाकडून (Education Department) विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाच्या शिलाईचे काम जोमाने सुरू असून विद्यार्थ्याना लवकरात लवकर गणवेश उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील ४४ लाख ६० हजार ४ विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार आहेत. गणवेशासाठी प्रती गणवेश ३०० रुपये आर्थिक तरतूद उपलब्ध असून यामध्ये १९० रुपये कापड खरेदीकरिता तर ११० रुपये शिलाई, अनुषंगिक खरेदी आणि वाहतुकीकरिता निश्चित करण्यात आले, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गणवेशाच्या शिलाईचे काम सुरू असून ते लवकरात लवकर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.