
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यापूर्वी नाशिक लोकसभा निवडणूक लढण्यासाठी देखील इच्छुक होते. मात्र तिथे शिवसेना शिंदे गटाने अडचण केली म्हणून त्यांनी माघार घेतली. मग त्यांनी राज्यसभेवर जाण्यासाठी मनसुबे रचले होते. मात्र अचानक सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली. यामुळे छगन भुजबळ हे नाराज असून ते घरवापसी करणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
यावर आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठे विधान केले आहे. राज्यसभेच्या जागेवरून छगन भुजबळ नाराज नाहीत. लोकसभा निवडणुकीत नाव पुढे येऊनही तिकीट न मिळाल्याने अपमान झाल्याची भावना त्यांच्या मनात होती. त्यामुळेच त्यांनी खदखद बोलून दाखवली,’ अशी प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली आहे.
हसन मुश्रीफ यांनी पुढे सांगितले की, नुकतीच माझी छगन भुजबळ यांच्याशी या सर्व मुद्द्यांवरून चर्चा झाली. ते नाराज नाहीत. त्यांनी राज्यसभेची उमेदवारी मागितली होती. पण आम्ही त्यांना समजावलं. तुम्हाला राज्यात राहण्याची आवश्यकता आहे, असे आम्ही सर्वांनी त्यांना सांगितले होते. आपला जो नवीन पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य पक्ष म्हणून उदयाला आला आहे. सर्व जबाबदारी तुमच्यावर आहे. ओबीसींचे नेते म्हणून तुम्ही चांगले काम करत आहात. त्यामुळे तुम्हाला राज्यात राहायचे आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदही तुमच्याकडे आहे, अशा भावना आम्ही व्यक्त केल्या. आमचे म्हणणे ऐकल्यावर ते खूश होते.’
मात्र आता छगन भुजबळ यांची अस्वस्थता राष्ट्रवादी काँग्रेसला कुठे नेणार, भुजबळ खरेच घरवापसी करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
राज्यसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून भुजबळ यांनी प्रयत्न केले. मात्र पक्षाकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही संधी देखील हुकल्याने भुजबळ नाराज आहेत हे लपून राहिलेले नाही.
दरम्यान, राज्यात सध्या महायुतीतील घटक पक्षांचे विधानसभा निवडणुकीचे जागावाटप हा कळीचा मुद्दा आहे. भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्या जागा वाटपावरून मोठी ओढाताण होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भुजबळ यांची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायदेशीर ठरते की अडचण करून जाते हा सध्या चर्चेचा विषय आहे.