Saturday, June 29, 2024

मायेचा प्रताप

जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै

मन व परमेश्वर या दोघांचा घनिष्ट संबंध आहे. परमेश्वर हा आपल्या ठिकाणी ईश्वररूपाने नांदतो. ईश्वर म्हणजे काय? दिव्य ज्ञान, दिव्य जाणीव, दिव्य आनंद व दिव्य शक्ती या सर्वांचा मिळून जो निर्गुण परमेश्वर, तोच आपल्या ठिकाणी ईश्वर रूपाने नांदतो. ही जाणीव प्रथम गढूळ होते, मायेच्या प्रतापाने! गढूळ होते म्हणजे काय होते? जाणिवेला स्वरूपाचा विसर पडतो. का व कसा विसर पडतो, कोण विसर पाडतो याला उत्तर नाही. वेदांताला विचारलं, तर ते कानावर हात ठेवतात. माया म्हणजे काय असे त्यांना विचारले, तर आम्हाला माहीत नाही, असे उत्तर ते देतात. माया आहे कारण तिचा परिणाम दिसतो. परिणाम दिसतो म्हणून माया आहे असे आपण म्हणू शकतो; पण माया म्हणजे काय हे आम्हाला माहीत नाही. स्वरूपाचा विसर केव्हापासून पडला, हेही कोणाला माहीत नाही. याची सुरुवात कुठून झाली, केव्हा झाली हेही कोणाला माहीत नाही.

आपण जन्माला येतो, तो हा विसर घेऊनच म्हणूनच “किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित” असे तुकाराम महाराज म्हणतात. या फजित होण्याला तोड नाही; कारण जन्माला येतानाच, आपण देवाचा विसर घेऊन जन्माला येतो. देवाचा विसर हा शब्द बरोबर नाही; पण लोकांना समजावा म्हणून मी तो वापरतो. योग्य शब्द कुठला आहे, तर तो म्हणजे भ्रम. ज्यावेळेला स्वरूपाचा विसर पडतो, त्यावेळेला आपल्या ठिकाणी भ्रम निर्माण होतो. या भ्रमाचा अर्थ काय? आपण आपल्यालाच ओळखत नाही, अशी अवस्था होते म्हणून जेव्हा आपल्या दिव्य जाणिवेला मायेचा स्पर्श होतो, तेव्हा मायेच्या ठिकाणी भ्रम निर्माण होतो. भ्रम निर्माण होतो म्हणजे नेमके काय होते? “मी कोण?” असा भ्रम निर्माण होतो. पुढे शरीराच्या माध्यमांतून ते प्रगट होते म्हणून समोर जे दिसते, तेच आपण आहोत असे समजतो. मी शरीर, मी देह अशी एक प्रकारची धारणा जाणिवेने केली आहे.

गढूळ जाणीव म्हणजे जीव व शुद्ध जाणीव म्हणजे देव किंवा ईश्वर. ही गढूळ जाणीव भ्रमाने युक्त झालेली आहे. तिला आपण शरीर आहोत, असे वाटायला लागते. असे वाटणे यालाच कल्पना असे म्हणतात. पहिले भ्रम झाला, दुसरी कल्पना केली. कल्पना काय केली? जाणीव जरी गढूळ झालेली असली, तरी मुळात ती दिव्य आहे. स्वरूपाचा विसर पडल्यामुळे, भ्रम झाल्यामुळे या जाणिवेने स्वतःला शरीराइतके संकुचित केले.

उदाहरणार्थ एका खोलीतून आकाश दिसते. हे खोलीतून दिसणारे आकाश व बाहेरचे आकाश भिन्न आहेत का? भिंत आल्यामुळे ते वेगळे झाले; पण भिंत पाडली किंवा नाही पाडली तर ते एकच आहे. मात्र भिंत पाडून आकाश एक होईल, अशी कल्पना काही लोकांनी केली, म्हणजेच काय? जन्माला आलो व जन्म-मरणातून सुटका म्हणजे मोक्ष. शरीर नकोच हा संकुचित विचार लोकांमध्ये निर्माण झाला. जन्म नको, शरीर नको व जन्म-मरणातून सुटका म्हणजे मोक्ष पाहिजे.

आज कुठेही जा लोक केवळ मोक्षाचा विचार करतात. हेच आपण विसरलो की, भिंत पाडण्याची गरज नाही, तसेच शरीर नको म्हणण्याची गरज नाही. बाहेरचे आकाश व आतले आकाश एकच आहे. शरीराला नको म्हणायचे नाही; कारण शरीराच्या ठिकाणी असलेली आणि बाहेरची जाणीव एकच आहे. किंबहुना खरी गंमत अशी की, हे जे शरीर आहे, तेच जाणिवेत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -