Wednesday, April 30, 2025

श्रध्दा-संस्कृतीसाप्ताहिक

झुळुक वाऱ्याची...

झुळुक वाऱ्याची...

गार वाऱ्याची झुळुक जशी तापलेल्या शरीराला थंडावा देऊन जाते त्याचप्रमाणे संसारात समस्यांनी पोळलेल्या मनाला थंड करते, विसावा देते, ती माऊलींची ज्ञानेश्वरी होय.

ज्ञानेश्वरी - प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

अगदी गेल्या आठवड्यापर्यंत उन्हाचा जाळ आपल्याला जाळत होता; असह्य होत होता. अशा वेळी गार वाऱ्याची झुळुक आली आणि तापलेल्या शरीराला थंडावा देऊन गेली. त्याप्रमाणे संसारात समस्यांनी पोळलेल्या मनाला थंड करते, विसावा देते, ती माऊलींची ज्ञानेश्वरी होय.

यात गीतेतील तत्त्वज्ञान समजून घेताना, बुद्धीची मशागत होते. त्याचवेळी त्यातील अमृतमय काव्याने हृदयाची तार झंकारते. आपल्या अंतरीला अशी साद घालणाऱ्या काही अद्भुत ओव्या ऐकूया...

भक्त परमेश्वराशी एक झाला! आता ही सर्वोच्च अवस्था साकारताना माऊलींचे दृष्टांत सहजसुंदर, समर्पक तरी किती! ‘पाय पायावर चढेल काय?’ ‘अग्नी अग्नीसच जाळील काय? पाणी पाण्यातच स्नान कसे करील? ओवी क्र. (११६७) तसेच पाण्यावरील बुडबुडा मोठ्या वेगाने जरी धावत गेला, तरी तो पाण्याशिवाय भूमीवर धावत नाही, अर्थात त्याचे ते धावणे, हे न धावण्याच्याच ठिकाणी समजले पाहिजे.’ ओवी क्र. (११६९)

माऊली हे दृष्टांत देऊन, पुढे कृष्णाच्या तोंडून बोलतात की, ‘त्याप्रमाणे जो भक्त माझ्याशी एकरूप झाला आहे.’ या प्रत्येक दाखल्यात किती आगळेपण आहे, अर्थ आहे!

पाय हा आपला महत्त्वाचा अवयव आहे. चालणं आणि चढणं हे त्याचं काम होय; पण पाय पायावर चढेल काय? हे शक्य नाही; कारण तो एकरूप आहे. त्याप्रमाणे भक्ताचा प्रवास आहे. तोही मोठी यात्रा पार करून आला आहे. नव्हे एखादा पर्वत चढतो, त्याप्रमाणे चढून आला आहे. पाय आणि त्याचं चढणं या क्रियेतून या साधनेतील अपार कष्ट सुचवायचे आहेत. हे परिश्रम करून, साधक ईश्वराशी एक झाला आहे.

पुढील दाखला आहे अग्नीचा. अग्नी हे पंचतत्त्वांपैकी एक तत्त्व! तेज हा त्याचा विशेष. जाळणं, उजळणं हे त्याचं कार्य. अग्नी अग्नीला जाळेल कसा? भक्त हा साधनेने तेजस्वी झाला आहे. त्याच्यातील दुर्गुण जळून, तो प्रकाशित बनला आहे. परमेश्वरही असाच प्रकाशित आहे. मग आता त्यांच्यात फरक राहिला कुठे?

यानंतर येतो दृष्टांत तो पाण्याचा. पाणी हे पुन्हा एक तत्त्व आहे. प्रवाहीपणा हा त्याचा गुणधर्म. सर्व काही शुद्ध करणं, ही त्याची कामगिरी. आता भक्त कसा झाला आहे? पाण्याप्रमाणे निर्मळ! पुन्हा त्याने एवढी यात्रा, साधना केली म्हणजे तो प्रवाही आहे; पुढे जाणारा आहे. हे सुद्धा यातून सांगायचं आहे. यातच पुढे एक अप्रतिम ओवी येते– ‘जें सांडावें कां मांडावें। हें चालणें जेणें चालावें। तें तोयचि एक आघवें। म्हणोनियां॥ ओवी क्र. ११७०

म्हणूनच जे स्थल सोडावयाचे ते व ज्या स्थळास जावयाचे, ते उदक आहे. तसेच ते चालणारा आणि चालण्याचे पाय हा पाण्याचा थेंब असल्यामुळे ते एकरूपच आहेत. त्याप्रमाणे भक्त, ईश्वर आणि भक्तिमार्ग एकच आहेत.

‘जे स्थळ सोडायचे आणि ज्या स्थळी पोहोचायचे’ ही झाली गद्य भाषा. परंतु ज्ञानदेव इथे त्यासाठी किती छान क्रियापद वापरतात! ‘सांडावे’ आणि ‘मांडावे’ या शब्दांत गोडवा, नाद आणि अर्थपूर्णता आहे. अशा अवीट गोडीच्या ओव्या आपल्या बुद्धीचा ठाव घेतात. तापलेल्या मनावर बरसात करतात म्हणून आपला ‘उन्हाळा’ असह्य होतो. पाऊस आला नाही तरीही...

manisharaorane196@ gmail.com

Comments
Add Comment