दोन तासांपासून वाहतूक सेवा विस्कळीत
नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील चांदसैली घाट (Chandsaili Ghat) हा सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकादायक परंतु प्रेक्षणीय घाट म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी पावसाळ्यात या घाटात दरड कोसळण्याच्या (Land collapsed) घटना सातत्याने घडत असतात. त्यामुळे वाहतुकीची (Transportation) समस्या निर्माण होत असते. अशीच घटना पुन्हा चांदसैली घाटात घडली आहे. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र या दुर्घटनेनंतर काही तासांपासून घाटातील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक सुरू असतानाच ही दरड कोसळली, मात्र सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही. या दुर्घटनेनंतर दोन तासांपासून घाटातील वाहतूक ठप्प झाली असून ही दरड आता कधी बाजूला होणार? आणि रस्ता कधी सुरू होणार? याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नाही. सतत दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्या तरीही आमदार के.सी. पाडवी आणि आमदार राजेश पाडवी यांनी याबाबत कधीही ठोस भूमिका घेतली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
चांदसैली घाटातील रस्ता तळोदा आणि धडगाव तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे. हा दरड प्रवण भाग असून या घाटात नेहमी दरड कोसळत असतात. परंतु बांधकाम विभागाकडून याकडे दरवर्षी दुर्लक्ष केले जाते. यावर्षीही या भागात पहिल्याच पावसात दरडी कोसळल्याच्या घटना घडल्याने बांधकाम विभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, सर्व प्रवाशांना या ठिकाणी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.