Thursday, July 25, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वऑटोजगताला मस्का, रोजगारवाढीचा चस्का

ऑटोजगताला मस्का, रोजगारवाढीचा चस्का

अर्थनगरीतून… महेश देशपांडे

आर्थिक घडामोडींचे अभ्यासक

देशात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असताना या उद्योगातले अग्रणी इलॉन मस्क यांचे भारतातील गुंतवणुकीबाबत मौन का, असा प्रश्न अलीकडे चर्चिला गेला. दरम्यान हॉटेल उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगार वाढणार असल्याचे वास्तव तपशिलानिशी समोर आले. याच सुमारास चीन-अमेरिकन व्यापारयुद्धात भारताचा फायदा होत असल्याचे तथ्यही पुढे आले.

इलॉन मस्कची कंपनी ‘टेस्ला’ गेल्या अनेक दिवसांपासून भारतात येण्याचा विचार करत आहे. यासंदर्भात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. भारतानेही आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात सुधारणा केल्या आहेत. नवीन धोरण आल्यानंतर ‘टेस्ला’ लवकरच आपली गुंतवणूक योजना भारतात राबवेल असे वाटत होते, पण आता ‘टेस्ला’ पुढे काहीच हालचाल करताना दिसत नाही. मस्क यांनी भारताचा दौरा जाहीर करून अचानक रद्द केला आणि चीनला जाऊन आले. त्यामुळे भारताबाबत मौन का, असा प्रश्न आता पडला आहे.

नवीन ‘ईव्ही’ धोरणांतर्गत भारतातील योजनांबद्दल इलॉन मस्क यांनी सरकारला अद्याप माहिती दिलेली नाही. मस्क या वर्षी एप्रिलमध्ये २१-२२ तारखेला भारतभेटीवर येणार होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार होते; मात्र अखेरच्या क्षणी त्यांची भेट रद्द करण्यात आली. याआधी भारतभेटीबाबत त्यांनी ‘एक्स’वर लिहिले होते की, मी भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यास उत्सुक आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांनी मस्क यांची भेट घेतली होती. मस्क यांनी २०२४ मध्ये भारताला भेट देण्याची योजना असल्याचे सांगितले होते. ‘टेस्ला’ लवकरच भारतीय बाजारपेठेत प्रवेश करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एप्रिल महिन्यात ‘टेस्ला’ने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. असे असतानाही मस्क यांनी चीनला भेट दिली. कंपनी चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर कार बनवते. अहवालानुसार ‘टेस्ला’ने आपल्या योजनांबद्दल भारत सरकारला काहीही सांगितलेले नाही. व्यवसायाचे निर्णय कंपन्या जाहीर करतात; सरकार नव्हे, असे याबाबत सरकारी अधिकाऱ्यांना सांगितले. यासंदर्भात पत्रकारांनी ‘टेस्ला’ला ई-मेलद्वारे पाठवलेल्या प्रश्नांना कोणतेही उत्तर मिळालेले नाही.

दरम्यान, अयोध्येत रामजन्मभूमी मंदिर बांधले गेल्यापासून यात्रेकरूंची संख्या कमी झालेली नाही, हे वास्तव समोर आले. यापूर्वी उज्जैनमधील महाकाल लोक आणि बनारसमधील काशी विश्वनाथ कॉरिडॉरने या शहरांमधील पर्यटन आणि हॉटेल उद्योगाला नवसंजीवनी दिली आहे. कोविडदरम्यान आतिथ्य क्षेत्राला सर्वाधिक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. ही परिस्थिती आता हळूहळू सुधारत आहे. कोविडयुगातील मंदीचा प्रभाव हॉटेल आणि पर्यटनक्षेत्रात नाहीसा होत आहे. या काळात या क्षेत्रात भयंकर टाळेबंदी होते, आता ते रोजगारनिर्मितीचे यंत्र बनत आहे. येत्या १२ ते १८ महिन्यांमध्ये या क्षेत्रात दोन लाखांपर्यंत नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. हॉटेल्सचा विस्तारही होत आहे. अलीकडेच अयोध्या हे उत्तर प्रदेशमधील सर्वांत मोठे पर्यटन केंद्र म्हणून उदयास आले. त्यामुळे येथे अनेक हॉटेल्सचा विस्तार झाला आहे. आयटीसी ते लेमन ट्री आणि टाटा ग्रुपचे ताज हॉटेल येथे गुंतवणूक करत आहेत. अशा परिस्थितीत, येथे हॉटेल ऑपरेशन्स नोकऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अशी स्थिती केवळ अयोध्येमध्येच नाही तर, देशाच्या विविध
भागांमध्ये आहे.

मध्य प्रदेशमधील उज्जैन प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेचा विशेष दबदबा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या सर्व ठिकाणांचा प्रवास वाढला आहे. त्यामुळे हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रात नोकऱ्या वाढत आहेत. ‘टीमलीज सर्व्हिसेस’ या ‘स्टाफिंग सर्व्हिस कंपनीच्या अहवालानुसार पुढील १२ ते १८ महिन्यांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि पर्यटन क्षेत्रात दोन लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण होतील. यामध्येही सुमारे एक लाख रोजगार केवळ हॉटेल उद्योगात निर्माण होणार आहेत. हॉटेल इंडस्ट्री आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत असल्याचे अहवालात म्हटले आहे. हॉटेल कंपन्या नवीन बाजारपेठेत प्रवेश करत असल्यामुळे हॉटेल रूमची संख्या वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्या वाढत आहेत.

भारतात मे ते जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत शाळा-कॉलेजला सुमारे दोन महिन्यांच्या सुट्या असतात. अशा स्थितीत कौटुंबिक प्रवासाची वर्दळ असते. हा पर्यटनक्षेत्रातील पीक सीझन आहे. या कालावधीत नोकरी शोधणाऱ्यांच्या संख्येत २० ते ३० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -