११ जणांनी गमावले प्राण, ६०हून अधिक जखमी
डोंबिवली : एमआयडीसीमधील अमुदान नावाच्या केमिकल कंपनीत काल झालेल्या स्फोटामुळे डोंबिवली शहर हादरले आहे. कालपासून या दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ तसेच अग्निशमन दलाकडून अथक प्रयत्न सुरू आहेत. या बचावकार्यादरम्यान मृतांचा आकडा वाढत असल्याची माहिती मिळत आहे. सध्या या मृतांचा आकडा ११ वर पोहोचला असून ६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींमधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी दोन वाजता डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत भीषण स्फोट झाला. ही दुर्घटना इतकी भयंकर होती की परिसरातील २ ते ३ किमीपर्यंतच्या इमारतींच्या काचा फुटल्या तसेच हादरेही बसले. या दुर्घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल तसेच एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य सुरू होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले होते. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. आज सकाळी या सर्च ऑपरेशन दरम्यान आणखी तीन मृतदेह सापडल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता ११ वर पोहोचला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत अजूनही काही कामगार अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंपनीतील कामगारांच्या नातेवाईकांनी परिसरात मोठी गर्दी केली असून मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अद्यापही शोधकार्य सुरू असून संबंधित कंपनीचे मालक प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.