देवाकरिता स्वतःला विसरावे!

अध्यात्म - ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


तुम्ही स्वत:ला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण आपल्याला विसरतो; पण ते विषयाकरिता विसरतो. स्वत:ला विसरावे; पण ते विषयाकरिता विसरू नये. एखादे वेळेस असे होते की, एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो, हे आपले आपल्यालाच समजत नाही. अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरे.


त्याचप्रमाणे दु:खाची बातमी कळली म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो, तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचे होते. विषयासाठी देहभान विसरणे, हे केव्हाही वाईटच; परंतु देवाकरिता जर आपण आपल्याला विसरलो, तर ते फारच उत्तम. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे. आपण आता तसे करतो का? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की, लगेच आपण रागावतो; ते खरे भजन होत नाही. म्हणून भजन करताना, मी देवापुढे आहे आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरे कोणी नाही, असे मानूनच भजन करावे आणि तशी सवय ठेवावी म्हणजे देहभाव विसरता येईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा म्हणजेच विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वत:ची आठवण ठेवून प्रपंच केला, तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही.


व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावे; पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता, त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल. हे सर्व साधायला, परमेश्वराला शरण जाणे हा एकच सोपा मार्ग आहे आणि त्याकरिता नामस्मरणात राहणे हेच साधन आहे. कोणी चोवीस वर्षे साधनात राहूनही काही काम झाले नाही असे म्हणतात आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात, तेव्हा अशा लोकांतच अर्थ नसतो की गुरूमध्ये काही नसते? तर आपले आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का? त्याचप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरूकडे गेलो, तर गुरूची खरी भेट होईल का? ती शक्य नाही. याकरिता ते सांगतील ते साधन आधी करावे म्हणजे चित्त शुद्ध होते आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे आणि ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचे राहते? मग तो ज्या स्थितीत ठेवील, त्यातच समाधान होते. देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचेही कारण उरत नाही.


तात्पर्य : परमात्म्याचे स्मरण यातच विषयाचे विस्मरण.

Comments
Add Comment

संचिताचा जीवनावर प्रभाव

आपल्या प्रबोधनाचा विषय म्हणजेच "अंधारातून प्रकाशाकडे" हा पाहताना, आपण इतरही काही महत्त्वाचे विषय समजावून

ईश्वराचे अस्तित्व

मानवजातीच्या इतिहासात “ईश्वर आहे का?” हा प्रश्न केवळ धार्मिक नसून तत्त्वज्ञान, विज्ञान, मानसशास्त्र आणि

विठूची पुरणपोळी भक्तीचा उत्सव

"शिखरशिंगणापुरची आख्यायिका जुनी..." "विठ्ठलाला पुरणपोळी अर्पणाची धुनी..." "वाद नको नियमांचा, भावच खरी

“हरि बोल...!’’

काझीसाब, आज आपला सारा गावच पागल झालाय, असे वाटतेय. प्रत्येकाच्या तोंडून फक्त एकच शब्द येतोय.. “हरि बोल... हरि

संत नामदेव

बाप कवणाचा माय कवणाची बाप कवणाचा माय कवणाची । सोयरी धायरी तेही कवणाची ॥ द्रव्य संपत्ती देखती तंवचि मानिती

मानवी संस्कृती

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै आज जगात जे काही चाललेले आहे ते सर्वकाही संस्कारांमुळे चाललेले आहे. अनिष्ट