Sunday, January 19, 2025
Homeक्राईमPune Car accident : पोर्शे कार अपघातप्रकरणी कारवाईबाबत दोन्ही अर्ज कोर्टाने फेटाळले!

Pune Car accident : पोर्शे कार अपघातप्रकरणी कारवाईबाबत दोन्ही अर्ज कोर्टाने फेटाळले!

कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाल्याने पुणे पोलीस आयुक्तांचं पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण

अपघातातील पोर्शे कार विनानोंदणी असल्याचीही धक्कादायक माहिती उघड

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात (Kalyani Nagar Accident) रविवारी पहाटे आलिशान पोर्शे कारने (Porsche Car) दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघे तरुण-तरुणी मृत्युमुखी पडले. याप्रकरणी अल्पवयीन कारचालक वेदांत अग्रवाल (Vedant Agrawal) याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांच्यासह ७ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत असून पुणे पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, दोन दिवसांत पुण्यातील पब्ज संदर्भात नवीन धोरण आणणार असल्याचं जाहीर केलं.

अमितेश कुमार म्हणाले, आमच्यावर कोणाचाही दबाव नसून कडक कारवाई करणे हीच आमची भूमिका आहे. रविवारी आम्ही कोर्टात दोन अर्ज दाखल केले होते. पहिला अर्ज आरोपीला प्रौढ ठरवण्याचा आणि दुसरा रिमांड होमचा. मात्र दुर्दैवाने कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले. हा अत्यंत गंभीर गुन्हा असून यामध्ये ३०४ कलमांतर्गत सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा आहे. त्यांचं वय हे १६ वर्षापेक्षा अधिक आहे. त्यामुळे बालन्याय कायद्यानुसार प्रौढ म्हणून वागणूक मिळाली पाहिजे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मद्य पिऊन रहादारीच्या रस्त्यावर वेगाने वाहन चालवणे हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. जोपर्यंत या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना १४ दिवसासाठी रिमांड होममध्ये पाठवण्यात यावे. मात्र कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले, असं अमितेश यांनी सांगितलं.

या संपूर्ण घटनेनंतर आता विरोधकांनी पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यावर अमितेश कुमार म्हणाले, पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा आणखी जास्त कडक भूमिका कोणी सुचवत असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून कायद्याच्या मार्गावर आहे. जी दुर्दैवी घटना घडली आहे, ज्या दोन निष्पाप जीवांचा बळी गेलाय त्यांना न्याय मिळावा तसेच आरोपीला कठोर शिक्षा मिळावी हीच आमची भूमिका आहे. कोणत्याही प्रकारचा दबाव पोलिसांवर कधी नव्हताच, अस त्यांनी स्पष्ट केलं.

पब संदर्भात दोन दिवसांत नवीन धोरण करणार

अमितेश कुमार म्हणाले, अपघातप्रकरणी जर कोणाचे काही आक्षेप असतील, आरोप असतील तर त्यावर माझी कोणाशीही जाहीर चर्चा करण्याची तयारी आहे. पुण्यातील पब संदर्भात दोन दिवसांत नवीन धोरण तयार करणार आहोत, त्यावर आम्ही सध्या काम करत आहोत. पोलिसांकडून पुण्यातील ‘पब्ज’ला वेसन घालण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत, असं ते म्हणाले.

अपघातातील पोर्शे कार विनानोंदणी

अपघातातील महत्त्वाची बाब म्हणजे आलिशान पोर्शे कार केवळ विनाक्रमांकच नव्हती, तर ही कार विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंगळुरुमध्ये तात्पुरती नोंदणी करुन ही कार पुण्यात आणण्यात आली होती. त्यानंतर मार्चमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक कार्यालयात सुरु होती. मात्र ती अजूनपर्यंत पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे ही कार इतके दिवस विनानोंदणी धावत होती. या प्रकारामुळे आता पुणे पोलिसांवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. इतरवेळी हेल्मेट घातलं नसताना कारवाईचा दंड ठोठवणारे पोलीस मार्चपासून ही कार विनाक्रमांक धावतेय, हे का बघू शकले नाही?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -