प्रचाराचा थंडावल्या तोफा, आता मतदारांच्या कौलाची प्रतिक्षा
मुंबई : देशात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुक होत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे चार टप्पे पार पडले असून सोमवारी, दि. २० मे रोजी महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण १३ मतदारसंघांत मतदान होणार असून शनिवारी सांयकाळी ५ वाजता उमेदवारांच्या प्रचाराचा धुराळा पूर्णपणे विसावला आहे. आता मतदार राजाच्या कौलाची प्रतिक्षा उमेदवारांना असून अवकाळी पाऊस, उन्हाचा तडाखा या पार्श्वभूमीवर मतदारांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यत घेऊन जाण्यासाठी उमेदवार, उमेदवारांचे कार्यकर्ते, पक्षीय पदाधिकारी, मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची खरी कसोटी लागणार आहे.
पहिला टप्पा १९ एप्रिलला, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी पार पडला असून महाराष्ट्रातील मतदानाचा अखेरचा टप्पा २० मे रोजी पार पडणार आहे. यंदाची २०२४ची महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक विशेष ठरली आहे. दोन गटात विभागलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ होती. केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, डॉ. श्रीकांत शिंदे, राहूल शेवाळे, अॅड. उज्ज्वल निकम, हेमंत गोडसे, नरेश म्हस्के या उमेदवारांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलेली आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत, ८० जागांसह उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र राज्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. लोकसभा निवडणुक प्रचारासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी मतदारसंघामध्ये महायुती तसेच महाविकास आघाडीची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागल्याने पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेचे राज ठाकरे यांच्यासह रथी-महारथींनी प्रचारादरम्यान महाराष्ट्र पिंजून काढला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहूल गांधी, अरविंद केजरीवाल, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोळे यांच्यासह नेते, पदाधिकारी प्रचार अभियानात व्यस्त झाले होते.
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात २० हून अधिक प्रचारसभा घेतल्याने अब की बार, चार सौ पारचा नारा महायुतीने गंभीरपणे घेतल्याचे प्रचारात दिसून आले. ही लोकसभा निवडणूक शरद पवारांची राष्ट्रवादी, उबाठा सेना यांच्या अस्तित्वावर, जनाधारावर व राजकीय प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब करणारी असल्याने महाविकास आघाडीनेदेखील ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. चौकसभा, रोड शो, प्रचार सभा, घरटी अभियान, सोशल मीडिया यामुळे महाराष्ट्राचा कानाकोपरा गेल्या महिन्याभरात राजकीय वातावरणात गजबलेला होता, परंतु शनिवारी सांयकाळी ५ वाजता प्रचार संपल्याने महाराष्ट्रातील राजकीय धुराळा पूर्णपणे शांत झाला आहे. आता सोमवारी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.