अद्दल घडली
खरंच सांगतो दोस्तांनो
एकदा काय घडलं
आभाळातून पावसाला
मी खाली ओढून आणलं
म्हटलं काय रे गड्या
तू ढगात लपून राहतोस
आम्हाला कोरडं ठेवून
वरून मजा पाहतोस
मी ओरडताच रागानं
तो हमसाहमशी रडला
मी म्हटलं चूप बस!
तरीही नाहीच थांबला
रडून रडून पावसानं
रान केलं ओलंचिंब
मला काहीच सुचेना
झालो मी चिनबीन
काही केल्या पावसाचं
रडू जराही थांबेना
चहूकडे पाणीच पाणी
काय करावं सुचेना
शेवटी आठवले काही
मी सूर्यालाच बोलावले
सूर्याला पाहताच
पावसाचे रडू पळाले
पाऊस जाता निघून
मनात विचार आला
पावसावर रागवलो
त्रास मलाच झाला
कानाला लावला खडा
पावसावर रागवायचं नाही
एकमेकांच्या साथीनेच
रान छान तरारून येई…!
काव्यकोडी : एकनाथ आव्हाड
१) तुरटपणा याच्या
अंगात भिणला,
तरी नाही याचा
वापर थांबला
सी जीवनसत्त्व
खूप याच्याकडे
त्रिफळा चूर्णात
सांगा कोण दडे?
२) पावसात, उन्हात
वापरतात खूप
रंगीबेरंगी
असे तिचे रूप
तिच्या लांब दांड्याला
भिऊ नका राव
झटकन सांगून टाका
तिचे आता नाव?
३) वरून लालेलाल
आतून बियांनी भरलेला
सूप आणि साॅसही
याचाच ठरलेला
आंबट-गोड चव याची
जिभेवर खेळे
रक्तातील रक्तकण
वाढे कुणामुळे?