Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलColourful Stars : रंगीत तारे

Colourful Stars : रंगीत तारे

  • कथा : प्रा. देवबा पाटील

यशश्रीचे विज्ञानाचे ज्ञान बघून, परीला खूप आनंद होत होता. तीही यशश्रीचे कौतुक करीत होती.

“परीताई, आमच्या सरांना खूप ज्ञान आहे. त्यंाना खूपच माहिती आहे. ते आम्हाला खूप छान शिकवतात आणि सामान्य ज्ञानाची बरीच माहिती सुद्धा सांगतात. आमचे सर तर सांगत होते की, सकाळी वा सायंकाळी दिसणारे ग्रहसुद्धा केव्हा केव्हा लुकलुकतात.” यशश्री म्हणाली.

“खरे आहे ते.” परी पुढे म्हणाली की, “त्याचे असे आहे की, ता­ऱ्यांच्या मानाने ग्रह आपणास खूपच जवळ आहेत. त्यामुळे ग्रह ता­ऱ्यांप्रमाणे प्रकाशबिंदू म्हणून न दिसता प्रकाशाचे बिंबे किंवा वर्तुळे म्हणून दिसतात. त्यांच्या प्रकाशामुळे या बिंबांचे सूक्ष्म आकार लक्षात येत नाहीत. या बिंबावरील प्रत्येक बिंदू हा लुकलुकत असतो; परंतु त्यांच्या तेजामधील बदल हा स्वतंत्रपणे आणि वेगवेगळ्या क्षणी घडत असतो. एका बिंदूचे तेज अंधुक होते, तर त्याचवेळी दुस­ऱ्याचे वाढते आणि परिणामी त्यांचा एकूण प्रकाश स्थिर दिसतो. मात्र ग्रह क्षितिजाजवळ असताना, त्यांचे तिरकस किरण वातावरणाच्या दाट थरांतून जातात. त्यामुळे त्या वेळी ते काहीसे लुकलुकताना दिसतात.”

“ तारे जर लुकलुकतात, तर सूर्य हा तारा असून, त्याचा प्रकाश स्थिर कसा दिसतो?” यशश्रीने प्रश्न उकरला.

“सूर्याचे अंतर पृथ्वीपासून इतर ता­ऱ्यांच्या मानाने खूपच जवळ आहे. म्हणून तो आपणास बिंदूसमान न दिसता, बिंबासारखा म्हणजे एखाद्या बशीसारखा दिसतो.

सूर्यापासून निघणारा प्रकाश हा एकमेव एकेरी बारीक किरणासारखा नसून, तो प्रकाश हा झोतासारखा म्हणजे आगीच्या ज्वाळेसारखा पसरट असतो. त्यामुळे हलणा­ऱ्या हवेतून जाताना, त्या झोताचे सर्व किरण हे एकसाथ सारखेच हलत नाही. त्यामुळे तो आपणास लुकलुकल्यासारखा वाटत नाही. तारे आपल्या पृथ्वीपासून लाखो, करोडो प्रकाशवर्ष दूर आहेत. त्यामुळे ते एखाद्या बिंदूसारखे दिसतात. त्यामुळे त्यांच्यापासून प्रकाशझोतही निघत असला, तरी तो पृथ्वीपर्यंत पोहोचेपर्यंत क्षीण होतो व एका एकमेव किरणासारखा दिसतो. म्हणून हलणाऱ्या हवेतून तो हलल्यासारखा वाटतो.” परीने खुलासेवार माहिती सांगितली.

“आकाशात रात्री निरनिराळ्या रंगाचे तारे कसे छान दिसतात परीताई? त्यांचे रंग वेगवेगळे असतात का?” यशश्रीने विचारले. “किती सूक्ष्म निरीक्षण आहे, यशश्री बेटा तुझे आकाशाचे. मला तर तुझी निरीक्षण क्षमता व चौकसबुद्धी बघून खूप आनंद होत आहे. आपण जर रात्री आकाशाकडे बारकाईने बघितले, तर आपणास निरनिराळ्या रंगांचे तारे दिसतात.

अगदी बरोबर आहे हे. आकाश निरभ्र असताना सूर्यास्तानंतर अंदाजे अर्ध्या ते पाऊण तासाने आकाशात तारे दिसू लागतात. विशेष म्हणजे जून महिन्यात मध्यरात्री अवकाशातील अर्ध्या भागातील तारे दृष्टीस पडतात, तर उरलेले डिसेंबर महिन्यात अर्ध्यारात्री दिसतात. काही तारे आपल्या सूर्यासारखे पिवळे, काही तांबडे तर काही गुलाबी, काही हिरवे तर काही निळे, काही पांढरेशुभ्र तर काही नारिंगी रंगाचे दिसतात. ताऱ्यांचा रंग हा त्यांच्या उष्णतेवर अवलंबून असतो. जसे तुमच्या पृथ्वीवर लोहार ज्यावेळी लोखंड तापवतो, त्यावेळी ते लोखंड तापताना प्रथम तांबड्या रंगाने चकाकते. जसजशी त्याची उष्णता वाढत जाते, तसतसे ते पिवळसर होते. आणखी उष्णता वाढल्यास, ते पांढरे दिसते व त्याला आणखी तापवत राहिल्यास नि त्याची उष्णता खूप वाढल्यास ते निळसर पांढरे दिसते. ता­ऱ्यांचेही रंग तसेच त्यांच्या उष्णतामानानुसार असतात.” परीने खुलासेवार सांगितले.

“उष्णतामानानुसार असतात म्हणजे कसे? ताई, मला काही समजले नाही.” यशश्रीने स्पष्टपणे विचारले. “सांगते, त्याचे असे आहे यशश्री,” परी सांगू लागली, “कमी उष्णतेचे तारे लाल रंगाचा प्रकाश देतात नि लालसर तांबूस दिसतात, त्यांना ‘लाल तारे’ म्हणतात. जे लाल तारे आकाराने प्रचंड मोठे असतात, त्यांना ‘राक्षसी लाल तारे’ म्हणतात. अतिशय जास्त उष्णतेचे तारे निळसर पांढरट रंगाचा प्रकाश देतात व निळसर पांढरट दिसतात त्यांना ‘नीलवर्णी तारे’ म्हणतात. तुमचा सूर्य व आमचाही मित्रही हा मध्यम उष्णतेचा असल्याने पिवळा प्रकाश देतो व पिवळसर दिसतो म्हणून तुमचा सूर्य व आमचा मित्र यांना ‘पीतवर्णी तारे’ म्हणतात. म्हणूनच आपल्याला ऊन हे पिवळसर दिसते. जे तारे थंड असतात, त्यांना ‘श्वेत तारे’ म्हणतात व त्यांचे तेजही कमी असते. जे श्वेत तारे आकाराने जास्त लहान असतात, त्यांना ‘श्वेत बटू तारे’ म्हणतात.

“चला आता यशश्रीताई. श्वेत बटू ता­ऱ्यांची माहिती आपण उद्या बघू.” परीताई बोलली. “ठीक आहे ताई.” यशश्री उत्तरली व त्यांच्या विज्ञान गप्पांना खंड पडला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -