Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Accident news : चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्...

Accident news : चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्...

बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली!


बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक बस जळून झालेल्या अपघाताने (Buldhana Bus Accident) सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. या भीषण दुर्घटनेत ट्रॅव्हल्समधील २५ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना अजूनही लोकांच्या चांगलीच लक्षात असताना आता पुन्हा तशीच एक दुर्घटना काल होता होता वाचली आहे. बुलढाणा येथून चारधाम यात्रेसाठी (Chardham yatra) निघालेल्या भाविकांच्या लक्झरी ट्रॅव्हल्सने मध्यप्रदेशातील शिवपुरीजवळ अचानक पेट घेतला. परंतु चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचले.


बुलढाणा येथील ३० तर धामणगाव बढे (ता. मोताळा) येथील ३० भाविक दोन ट्रॅव्हल्सद्वारे चारधाम दर्शनासाठी निघाले होते. दरम्यान, कोलारस पोलीस ठाण्याअंतर्गत शिवपुरी ते गुना या चारपदरी महामार्गावर एका बसने अचानक पेट घेतला. अचानक गाडीतून धूर निघताना दिसताच चालकाने बस थांबविली आणि भाविक प्रवाशांना ट्रॅव्हल्सखाली उतरण्यास सांगितले. प्रवासी उतरताच बसने पेट घेतला. आगीने संपूर्ण बसला आपल्या कवेत घेतले. कोलारस पालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझविली. बसचा नुसता सांगडाच उरला आहे.


या दुर्घटनेतून बुलढाण्यातील तीस भाविकांचे प्राण वाचले. यात १८ महिला तर १२ पुरुष भाविकांचा व चालकाचा समावेश आहे. दरम्यान, या भाविकांना काल रात्री कोलारस येथील मंगल कार्यालयात थांबविण्यात आले होते. या घटनेमुळे पुन्हा एकदा ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment