गजानन महाराज – प्रवीण पांडे, अकोला
ही गोष्ट आहे २००० सालची. मी शोभना माधव बापट आणि माझे मिस्टर दोघे शेगावला जाणार होतो. त्याकाळी ऑनलाइन बुकिंगची सोय नसल्याने, माझ्या मिस्टरांनी कल्याणला जाऊन तिकीट बुकिंग केले. मी बँकेत नोकरी करत असल्याने, तीन दिवस सुट्टी असेल, असे बघून शेगाव येथे जाऊन यावे, असे ठरविले होते. रात्रीची गाडी होती म्हणून आम्ही सगळे आवरून निघालो आणि कल्याण येथे गाडीत बसलो. थोड्या वेळाने गाडीत काही लोक आले आणि “या सीट्स आमच्या आहेत.” असे म्हणू लागले, तेव्हा मी पुन्हा तिकीट काढून बघितले. बघते तर काय यांनी चुकून एक महिना नंतरचे तिकीट काढले होते.
बरेचदा धावपळीत आणि गडबडीत तिकीट बुकिंग करताना, अशा चुका होतात. आम्ही गाडीत तर बसलो होतो आणि गाडीने कल्याण स्टेशन सोडून देखील बऱ्यापैकी वेळ झालेला होता. आता काय करावे, असा प्रश्न आम्हा उभयतांना पडला. पण आता गाडीत चढलोच आहोत, तर बसून का होईना, शेगावला जायचेच, असे मी मनाशी ठरविले व तसे यांना सांगितले. मला असे वाटते की, या ठिकाणी माझी महाराजांवरची श्रद्धा आणि निष्ठाच असा निर्णय घेण्यास पाठबळ देऊन गेली असावी. एक तर सुट्ट्या पाहूनच शेगाव किंवा तीर्थक्षेत्री जाण्याचे निश्चित करावे लागते. त्यातून अशी चूक झालेली.
त्यामुळे “आपला रात्रभरचा प्रवास कसा होईल, ही सल मनात होतीच. त्यामुळे मी निष्ठापूर्वक महाराजांचा जप करतच होते. खरी गंमत तर पुढे आहे. नवल म्हणजे ज्या दोन सीट्सचे आम्ही बुकिंग केले होते, त्यांच्यावरच्या सीट्सवर कोणीही आले नव्हते आणि मग आम्ही त्यावर बसून प्रवास केला. खरे तर त्या वेळी थंडी ही खूप कडाक्याची होती. आता विचार मनात येतो की, जर त्या रात्री गाडीत सीट मिळाली नसती, तर प्रवास करणे अशक्यच होते. पण माझा ठाम विश्वास आहे की, हे महाराजांनीच घडवून आणले आणि आम्ही त्या रात्री सुखकर प्रवास करू शकलो. सकाळी गाडी शेगावला येऊन पोहोचली. मंदिरात आलो. छान दर्शन, पारायण, प्रसाद इत्यादी सर्व आरामात व्यवस्थित पार पडले. त्या रात्री जर जागा मिळाली नसती किंवा तिकीट तपासणीसाने तिकिटे तपासून उतरवून दिले असते, तर दर्शन झाले असते का?
या अनुभवातून महाराज भक्तांसाठी महाराज काहीही करू शकतात, याचा प्रत्यय आला.
जय गजानन माऊली!