उबाठा सेनेचे प्रमुख सध्या अस्वस्थ झाले असून प्रचारसभांमधून विकासकामे, देशापुढील समस्या, आव्हाने यावर न बोलता भाजपावर, विशेषत: भाजपा नेत्यांवर शिवराळ भाषेत टीका करण्याचाच एककलमी कार्यक्रम त्यांच्याकडून राबविला जात आहे. मुळातच भाजपा आणि भाजपा नेत्यांवर आरोप करताना उबाठा सेनाप्रमुख जनसामान्यांमध्ये स्वत:चेच हसे करून घेत आहेत. सभ्यतेचा बुरखा पांघरण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचे हे फसवे प्रयत्न उघडे पडले असून जनतेसमोर त्यांचा खरा चेहरा गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने पुढे आलेला आहे. त्यातून आत्मपरीक्षण न करता, चुकांचा शोध घेत त्यातून बोध न घेता त्यांचा खोटे बोल पण रेटून बोल असा जीवनक्रम बनला आहे. आनुवंशिकतेने वारसा मिळतो, नाव-आडनाव मिळते, पण कार्यातून तो वारसा टिकवावा लागतो, जोपासावा लागतो, हे आज उबाठा सेनेच्या ठाकरेंना ठणकावून सांगण्याची वेळ खऱ्या अर्थांने आलेली आहे.
ज्या शरद पवारांच्या विरोधात बाळासाहेब ठाकरेंनी सातत्याने प्रचार केला, रणशिंग फुंकले, कधी राजकीय जवळीक केली नाही. त्या पवारांचे गोडवे गाण्याची वेळ आज उबाठा सेनाप्रमुखांवर आलेली आहे. १९९१ साली विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान छगन भुजबळांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेत पहिल्यांदा फूट पडली, त्यामागचे खरे सूत्रधार शरद पवारच होते. ज्यांनी शिवसेना फोडली, त्यांच्याच खांद्याला खांदा लावून महाआघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात उबाठा सेनाप्रमुख धन्यता मानत आहे. ज्या भुजबळांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना तुरुंगात टाकण्याची पूर्ण तयारी केली होती, त्याच भुजबळांना मंत्रिमंडळात घेऊन मुख्यमंत्रीपदावरून राज्याचा कारभार हाकण्यात या उबाठा सेनाप्रमुखांना कोणताही कमीपणा वाटला नाही. ज्या दिवशी काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल, त्या दिवशी मी माझे दुकान बंद करेन, अशी भूमिका शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा जाहीरपणे मांडली होती.
आता उबाठा सेनाप्रमुख माझा बाप चोरला, असा टाहो फोडतात, त्यांनीच काँग्रेसबरोबर अडीच वर्षे राज्यात कारभार चालविला. बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात जे भूमिका घेतात, ते उबाठा सेनाप्रमुख रक्ताने बाळासाहेबांचे वारस ठरू शकतात, पण विचारांनी अथवा कृतीने नाही, हे महाराष्ट्राने जवळून पाहिले आहे, अनुभवले आहे. भाजपा व भाजपा नेत्यांवर टीका करताना उबाठा सेनाप्रमुख भाजपाचे व आपले हिंदुत्व वेगळे असल्याचा टाहो फोडतात. पण हिंदुत्व हे हिंदुत्वच असते. त्यात डावे-उजवे फरक असण्याचा प्रश्नच नाही. फक्त आपल्या सोयीनुसार राजकीय कुस बदलताना हिंदुत्वाची व्याख्या लावण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या उबाठा सेनाप्रमुखांनी चालविला आहे. भाजपामुळे देशातील अयोध्येत रामजन्मभूमीच्या जागेवर रामलल्लाचे मंदिर साकारले गेले, हे कोणालाही नाकारता येणार नाही.
निमंत्रण असतानाही रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी उबाठा सेनाप्रमुख अयोध्येत गेले नाही. कारण रामलल्लाहून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या शरद पवारांची मर्जी संपादन करणे त्यांच्या लेखी महत्त्वाचे असल्याचा आरोप आज महाराष्ट्रातील जनतेकडून उघडपणे केला जात आहे. बाबरी मशीदचे पतन झाले, त्यावेळी भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आरएसएस, बजरंग दलाचे घटक शेकडोंच्या नव्हे तर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. त्याचे पुरावेही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यावेळी उबाठा सेनाप्रमुख कुठे काय करत होते, याचा त्यांनी आजतागायत उलगडा केलेला नाही. जे रामरायाच्या जन्मभूमीसाठी संघर्ष करत होते, रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला हजर होते, त्यांचे हिंदुत्व खरे का जे संघर्ष करायला नव्हते, हे राम मंदिराच्या कार्यक्रमालाही गैरहजर होते, त्यांचे हिंदुत्व खरे, हे या हिंदुस्थानातील जनतेला कोणी नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यांना सर्व कळून चुकले आहे. भाजपासोबत होतो, असा टाहो आज उबाठा सेनाप्रमुख फोडत असले तरी ते राजकारणात सक्रिय होण्याअगोदरपासून शिवसेना-भाजपाची युती होती.
बाळासाहेब ठाकरे व वाजपेयी यांच्या स्नेहबंधातून आणि प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांतून शिवसेना-भाजपा युती अस्तित्वात आली होती. शिवसेनेमुळे भाजपाला महाराष्ट्रात विस्तार करण्याची काही अंशी संधी मिळाली असली तरी याच भाजपामुळे शिवसेनेला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली होती, हेही नाकारून चालणार नाही. भाजपाशी राजकीय मनोमिलाफ होण्याअगोदर शिवसेना तत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील ठरावीक शहरी भागांपुरतीच सीमित होती आणि त्या त्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच शिवसेनेचा प्रभाव होता. भाजपाशी युती झाल्याने शिवसेनेचे खासदार मोठ्या संख्येने निवडून आले. दिल्लीदरबारी शिवसेनेला वलय प्राप्त झाले, तेही केवळ भाजपामुळेच. या वस्तुस्थितीचा स्वीकार आज सर्वांनाच करावा लागणार आहे. शिवसेनाप्रमुखांना जे जे हवे होते, ते ते सर्व वास्तवात आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी व राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदे व फडणवीस यांनी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे व आजही करत आहेत.
अयोध्या शहरामध्ये प्रभू रामचंद्रांचे मंदिर निर्माण करणे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० काढून टाकावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण झाले. त्यामुळे सगळ्यात जास्त राग नकली शिवसेनेला येत असल्याचे प्रत्युत्तर देत पंतप्रधान मोदी यांनी उबाठा सेनेचा व त्यांच्या प्रमुखांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणला आहे. हृदयात राम असल्याचा दावा करणारे रामलल्लाच्या प्रतिष्ठापना कार्यक्रमाला आले नाहीत, त्यांनी हिंदुत्वाचा जागर करावा यातून त्यांचे हिंदुत्वाविषयीचे बेगडे प्रेम उघड झाले आहे. हाताला काम म्हणणाऱ्यांनी अडीच वर्षांत सत्ता सांभाळताना किती हातांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे, हे आजतागायत सांगितलेले नाही. पंतप्रधान मोदींचे गेल्या १० वर्षांत पंतप्रधान पदावरून केलेले कार्य अलौकिक आहे. मोदींवर टीका करून मतदारांची दिशाभूल करण्याचा फसवा प्रयत्न जनतेसमोर स्पष्ट झाला आहे. हिंदुत्वाचे पांघरुण घेत काँग्रेस व राष्ट्रवादीशी सत्तेसाठी जवळीक साधणाऱ्यांचा बुरखा आता फाटला असल्याने केवळ टाहो फोडण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आज सुरू आहे. काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी आतुर असलेल्यांनी हिंदुत्वाबद्दल न बोलणेच बरे ठरेल.