समर्थ कृपा – विलास खानोलकर
पहाटे भक्त विचारती, स्वामींना आम्ही कशी प्रार्थना करावी म्हणजे मातृदिनी विश्वशांती प्राप्त होईल. स्वामी म्हणती भक्ता, प्रार्थना ही त्रितापहारिणी आहे. पण खोल अंतःकरणातून मनातून निघाली पाहिजे. स्वतःच्या शब्दात मग ते शब्द तोडके मोडके असले, तरी तुमच्या भावना त्या परमेश्वराकडे पोहोचल्या पाहिजेत. प्रार्थना आपण रोजच करतो ना! पण कशी स्वतःपुरती मर्यादित मला हे दे, मला ते दे, माझी अमूक एक इच्छा पूर्ण कर वगैरे. पण कधी तुम्ही दुसऱ्यासाठी प्रार्थना केलीय का? नाही तर करून बघा.
रोज दिवसातून एकदा ठरावीक वेळी देवळात जायचे किंवा नुसतेच आकाशाकडे बघून स्वतःसाठी नाही, तर सर्वांसाठी प्रार्थना करायची. स्वतःसाठी काही मागायचे नाही. मग बघा सहा महिन्यांत तुमच्या स्वतःच्याच परिस्थितीत आणि तुमच्यात किती तरी सकारात्मक बदल घडेल, तो तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. कारण असं म्हणतात की, आपण दुसऱ्याच्या हाताला अत्तर लावलं की, ते अत्तर अगोदर आपल्याच हाताला लागतं. कारण ईश्वरी नियम आहे तो.
तू दुसऱ्यासाठी कर, मी तुझ्यासाठी करीन. तू दुसऱ्याची झोळी भर मी तुझी झोळी कधीच रिकामी होऊ देणार नाही. पण आपला कधी विश्वासच नसतो देवावर आणि स्वतःच्या प्रार्थनेवरसुद्धा. कारण मनापासून केलेली प्रार्थना देवाला घातलेली साद ही त्याच्यापर्यंत पोहोचतेच आणि त्याचा प्रतिसाद तुम्हाला मिळतो. म्हणून जे काही कराल ते मनापासून कळकळीने, सद्भावनेने करा. मग पाहा त्याचे फळही गोडच लागेल. यासाठी तुम्ही वैश्विक प्रार्थना करू शकता किंवा स्वतःची बनवलेली करू शकता. फक्त ती सर्वांसाठी, विश्व कल्याणासाठी असेल तर फायदा जास्त होईल. जसं की ‘हे ईश्वरा सर्वांना सुखी ठेव’ ही प्रार्थना आणि जगप्रसिद्ध संत ज्ञानेश्वरांचे पसायदान काहीच येत नसेल, तर या दोन प्रार्थना प्रसिद्ध आहेत.
प्रत्येकाने इतरांना दुर्बलांना, आंधळ्यांना, गरीब, गांजलेल्यांना सांगावे ।। भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे।। आणि सांगावे स्वामी समर्थ आहेत. ते तुम्हाला मदत करतीलच. आम्हीही करू.
प्रत्येकाने मातेसमान समाजावर प्रेम करावे व समाज प्रेमाने उभा करावा. आई मुलांसाठी जसे ईश्वराकडे प्रार्थना करते मुलांचे कल्याण कर, सर्वांना सुखी ठेव. तसेच प्रत्येकाने मातृदेवतेप्रमाणे मुलांवर व जनतेवर प्रेम करावे. झाडे, नदी नाले, पशू-पक्ष्यांवर, पृथ्वीमातेवर प्रेम करावे. कुणी भुकेला, छपराशिवाय, घराशिवाय, पाण्याशिवाय, शिक्षणाशिवाय, दुधाशिवाय राहू नये. प्रत्येक स्वामी मठ मानव संस्कार केंद्र व गरीब मदतकेंद्र व्हावे. प्रत्येकाला मठात माहेरी आल्यासारखे वाटावे, हीच माझी इच्छा आहे.
स्वामीमाता सर्वदाता
प्रेमळ स्वामी म्हणती
आज माझी पुण्यतिथी ।।१।।
प्रत्येक दिवस उगवता माझी जयंती
प्रत्येक रात्री माझीच पुण्यतिथी ।।२।।
काय अर्थ याचा सांगा अतिथी
हरले सारे मानव आजमिती ।।३।।
रोज पुण्यकर्म करता होई जयंती
रोज दानधर्म करता होई पुण्यतिथी।।४।।
आठवा तुमची श्यामची आई
आठवा मदर तेरेसा ताई ।।५।।
आठवा तुमचीच आई
आठवा आईचीच आई ।।६।।
आठवा पिताजीची आई
आठवा पिताजींची आईची आई ।।७।।
आठवणीतील डोळे ओले बाई
नऊवारी पदरही ओला बाई ।।८।।
काय त्यांचे ते ममत्व
काय त्यांचे ते पितृत्व ।।९।।
आज आहे मातृदिन
माझाच जणू तो मातृदिन ।।१०।।
अनाथ बालकांचा आज मातृदिन
मजवीण नाही कोणी मातृहीन ।।११।।
मीच अनांथांचा बाबा आई
मीच अनायाचा बाबासाई ।।१२।।
मी दुर्बळांना करतो सबळ
अनाथ अपंगाना करते सबळ।।१३।।
मातृहीनाचा होतो माता
पितृहीनाचा होतो पिता।।१४।।
आठवण ठेवा फक्त खातापिता
नको मला तुमची मालमत्ता।।१५।।
दिनरात मला हवे थोडे प्रेम
वाटा दिन-गरीबांना थोडे प्रेम ।।१६।।
प्रेम करा गाईवासरे
चिमणी पाखरे पंख पसरे ।।१७।।
मीच इवल्या पंखात हवाभरे
मीच चोचीत चारा भरे ।।१८।।
पोपट, मोर, मैना सावली धरे
पाडसाच्या मुखात दुग्ध धारा धरे ।।१९।।
नका विसरू तुमची माता
नका विसरू पृथ्वी माता ।।२०।।
नका विसरू जगनमाता
नका विसरू भारतमाता ।।२१।।