महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुखपत्राला एक मुलाखत दिली आहे. आता निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात प्रचाराचा एक भाग म्हणून त्यांची ही मुलाखत विश्वप्रवक्त्यांनी घेतली आहे. ही मुलाखत म्हणजे खोटारडेपणाचा कळस आणि स्वतःचीच टिमकी वाजवण्याचा एक अश्लाघ्य प्रयत्न आहे. तू विचारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो अशा थाटाची ही मुलाखत म्हणजे अक्षरशः कीव येण्याजोगी आहे. मुलाखतीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर ज्या दुगाण्या झाडल्या आहेत त्या वाचल्या की मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाचे किती अधःपतन होऊ शकते याचा एक नमुना पाहायला मिळतो. या मुलाखतीत माजी मुख्यमंत्र्यांनी मोदी आणि अमित शहा यांना नेहमीच्या थाटात शिव्याशाप दिले आहेत आणि त्यांना महाराष्ट्राचे वैरी वगैरे जे म्हटले आहे त्यावरून ही मुलाखत म्हणजे विधवाविलाप वाटतो. फक्त मोदी, शहांच्या नावाने बोटे मोडण्याचेच बाकी होते. मुलाखतीत शब्दाशब्दांत खोटेपणा भरला आहे आणि त्यात मी आणि माझा पक्ष सोडून सारे कसे महाराष्ट्राचे घातकी आहेत याचे मनसोक्त शिव्या देत वर्णन केले आहे. माझा पक्ष चोरला वगैरे नेहमीचे पालुपद तर आहेच. त्याला आता हास्यजत्रेचे स्वरूप आले आहे. पण केवळ विनोदाने घेऊन या प्रकारातील गांभीर्य नष्ट होऊ नये. अत्यंत जहरी, जहाल आणि महाराष्ट्राला पेटवण्याची चिथावणी या मुलाखतीत आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना उगीच आणले आहे.
पक्षप्रमुखांना कशातले काही कळत नाही हे त्यांनीच अनेकदा सांगितले आहे. पण त्यांना इतिहासातील काही माहितीही नाही. श्यामाप्रसाद मुखर्जींनी मुस्लीम लीगबरोबर जाऊन सरकार स्थापन केले होते ही एक लोणकढी थाप त्यांनी मारली आहे. वास्तविक त्यांना इतिहासातील काहीही ज्ञात नाही. श्यामाप्रसाद मुखर्जींनी मुस्लीम लीगसोबत जाऊन सरकार स्थापन केले नाही, तर वस्तुस्थिती अशी आहे की, १९३७ मध्ये जेव्हा अविभाजित बंगालमध्ये निवडणुका झाल्या तेव्हा कृषक प्रजापार्टीने सरकार स्थापन केले होते. पण काँग्रेसी आणि डाव्या गटांचा हा सातत्याने केला गेलेला अपप्रचार आहे आणि पक्षप्रमुख काहीही न विचार करता हेच असत्य सांगत असतात. मुस्लीम लीगने या सरकारला पाठिंबा दिला होता आणि १९४१ मध्ये त्यांनी तो काढूनही घेतला. बंगाल सरकारला मुस्लीम लीगशी काहीही देणे-घेणे नव्हते. काँग्रेस आणि डाव्या पक्षांची जी एक संयुक्त प्रचार यंत्रणा आहे ती सातत्याने उजव्या गटांना लक्ष्य करण्यासाठी या असत्याचा प्रचार करत असतात आणि आपल्याकडे काहीही माहीत नसलेले राजकीय नेते त्यालाच खरे म्हणून गृहीत धरत असतात. ही यंत्रणा मग सातत्याने आपले पाय पसरते आणि खरे सत्य काय ते कुणालाच समजत नाही. हे सुदैव आहे की, मुखर्जींबद्दल असत्याचे लेखी दस्तऐवज आहेत. पक्षप्रमुखांना इंग्रजी येत असेल, तर त्यांनी ते मुळाबरहुकूम वाचावे म्हणजे त्यांना यातील सत्य काय ते समजेल.
पण पक्षप्रमुखांना खरा राग आला आहे तो हिंदुत्ववादी विचारांचे एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवल्याबद्दल आणि त्यांच्याकडून सत्ता हिसकावून घेतल्याबद्दल. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी कुणी केली हे आता सर्वांना पाठ झाले आहे. त्यामुळे मोदी, शहांवर त्याचा राग काढण्यात काही अर्थ नाही. अडीच वर्षे सत्ता होती तेव्हा सारा काळ घरात बसून घालवला आणि आता सत्ता गेल्यावर त्यांना भरपूर काही दिसू लागले आहे. त्यांच्या प्रत्येक वाक्यात खोटारडेपणा आणि त्यापेक्षा काहीही नाही. त्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्यात शहाणा माणूस वेळ घालवणार नाही. कारण मोदी आणि शहा यांच्यावर तोंड फाटेपर्यंत आरोप करण्याशिवाय या मुलाखतीत आहे काय? खरे तर शिवसेना उबाठा गटाची ही नेहमीचीच पद्धत आहे. पूर्वी काँग्रेसच्या विरोधात होते तेव्हा मुखपत्रात अशाच मुलाखती छापून यायच्या. फक्त आता आरोप करण्याची पार्टी बदलली आहे. बाकी भाषा तीच असभ्य आहे. काँग्रेस नेत्यांवर, तर कधी शरद पवारांवर अशीच टीका केली जायची. बारामतीचा बंब्या, चुरमुऱ्याचं पोतं, तेल लावलेला पैलवान अशा शेलक्या शब्दांत पवारांवर टीका करून झाली.
आता पवार हे त्यांचे आदर्श नेते बनले आहेत. पण हा केवळ सत्तेचा खेळ आहे. उद्या त्यांच्या पक्षाशी बिनसले की याच मुखपत्रातून पवारांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली जाईल. खरे तर उबाठा गटाच्या मुखपत्राला अपशब्दांचा शोध लावल्याबद्दल पारितोषिक द्यायला हवे. जे मुखपत्रात तेच त्यांच्या तोंडी. त्यामुळे तिला मुलाखत म्हणणे म्हणजे मुलाखत या तंत्राचा अपमान करणे आहे. कोणी यांच्या बातम्या छापत नव्हते म्हणून मुखपत्र काढले. पण त्यातही शिवीगाळ सुरू केली आणि त्यालाच शिवसेना स्टाईल असे सोयीचे नाव दिले. पण सारा मामला पडद्याआडून केलेल्या गैरप्रकारांचा होता. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचे म्हणून सांगायचे आणि स्वतःच मुख्यमंत्री होण्याची संधी आली की व्हायचे हा यांचा ढोंगीपणा. कशाला त्यांनी महापुरुषांचे नाव घेऊन त्यांची बदनामी करायची याचा आता जनताच सवाल करेल. गुजरात आणि महाराष्ट्राबद्दल भावनिक राजकारण करून अगोदर मराठी माणसाला भडकवले आणि नंतर मुंबईच्या जमिनी अमराठी लोकांना विकून मराठी माणसाला बदलापूरला पळवून लावले, असे आरोप त्यांच्यावर नेहमीच केले गेले. एकूण ही मुलाखत म्हणजे करमणूक तर आहेच पण खोटारडेपणा पाहून चीड येण्याजोगीही आहे.