भालचंद्र कुबल – पाचवा वेद
हल्ली एकांकिका स्पर्धा बघायची म्हटली, तरी त्यात ‘तोच तो’पणा हमखास असतो. चालू ट्रेंडप्रमाणे एकांकिका हा साहित्य प्रकार एक तर सिनेमॅटिक तरी झालाय किंवा कुपोषित तरी राहिलाय. ‘मानाचि’ या लेखक संघटनेने आयोजित केलेली एकांकिका स्पर्धा काहीशी वेगळी असावी, असा समज तिच्या प्राथमिक फेरीच्या रचनेवरून वाटत होता. ज्येष्ठ लेखक सुहास कामत यांच्या संकल्पनेतून उत्स्फूर्त सादरीकरणाची ही स्पर्धा होती. या सादरीकरणाच्या प्राथमिक फेरीसाठी नामांकित लेखक दिग्दर्शकानी २० विषय दिले होते, पैकी चिठ्ठीत येईल, त्या विषयावर १५-२० मिनिटांचे सादरीकरण करायचे, अशी या स्पर्धेची प्राथमिक संकल्पना होती. नव्या पिढीला हा प्रकार नक्कीच चॅलेंजिंग वाटणार, यात शंकाच नव्हती. कारण एकांकिकांचे सादरीकरण हे ‘रायटर्स फर्स्ट’ या तत्त्वावर आधारीत होते.
लेखकांच्या उत्कर्षासाठी झटणारी, झगडणारी किंवा भविष्यात झंझावणारी संस्था म्हणून ‘मानाचि’कडे पाहत असता, या स्पर्धेमुळे लेखकांना मार्गदर्शक ठरावे, असा या उपक्रमाचा साचा असावा, हा माझा भाबडा समज होता आणि म्हणूनच खरं तर ही स्पर्धा पाहिली आणि प्रचंड निराशा पदरी पडली. प्राथमिक फेरीत सादर झालेल्या गुणानुक्रमे प्रथम पाच स्पर्धकांना अंतिम फेरीसाठी निवडले गेले. ही निवड अर्थातच त्या स्पर्धक संस्थेच्या लेखकाने फुलविलेल्या चिठ्ठीतून मिळालेल्या विषयावर आधारीत होती. पाच संस्थांना पुढे महिनाभराचा वेळ देऊन, अंतिम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. म्हणजेच लेखकापासून ते कलाकारांपर्यंत प्रत्येकाला टास्क देण्यात आला होता. महत्त्वाचा मूलभूत टास्क अर्थातच लेखकाने स्वतःच्या सृजनशीलतेनुसार बेतलेल्या कथाबीजाचा होता. प्राथमिक फेरीतील परीक्षकांना तो स्ट्राँग वाटला म्हणूनच तर पाच उत्कृष्ट संघांना अंतिम स्पर्धेची संधी मिळाली. म्हणजे पुन्हा लेखनाचाच विचार अग्रस्थानी झाला. विशेष म्हणजे प्राथमिक फेरीतील तीनही परीक्षकांपैकी एकही लेखक नव्हता. अर्थात ही दृकक्रांती म्हणायला हरकत नाही.
लेखकाची लायकी (श्रेणी या अर्थाने) तपासायला अभिनेते आणि दिग्दर्शक आपले श्रम पणाला लावतात व प्रेक्षकांना काय बघायला आवडेल याचा निर्णय घेणे म्हणजे दृकक्रांतीच…! तर अशा पद्धतीने पाचही संघ श्री छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने ‘मानाचि’च्या एकांकिका स्पर्धेत दाखल झाले. कट् टू…
या माझ्या लेखन यत्नास केवळ निरीक्षण किंवा फार तर स्पर्धा वृत्तांत असे संबोधावे. कारण माझा की-बोर्ड अद्याप वरून बघणाऱ्या नाडकर्णी, मनोहर, भावे किंवा पवार या समीक्षकांच्या लेखणी इतका धारदार झालेला नाही. असो. तर स्पर्धेच्या सादरीकरणाविषयी… पहिली एकांकिका ‘चौदा इंचाचा वनवास’ एक टिपिकल मॉब प्ले होता. आम्हा रुईयाइट्सना अशा मॉब प्लेची सवय १९८४-८५ पासून विनय आपटेने लावून ठेवल्याने ‘आणि रुईयाचे ८०’ या अनाऊंन्समेंटच्या टॅग लाईनचेही अताशा काही वाटत नाही, तर अयोध्येतल्या रामजन्मभूमीसाठी विस्तारीत रस्त्यासाठी रहात्या घरावर पाणी सोडायला लागलेल्या व त्यासाठी पर्याय नसलेल्या रामभक्ताची ही कथा. ऐकीव ज्ञानाचा हा कल्पना विलास म्हणजे फॅब्रिकेटेड कथाविस्ताराचे उत्तम उदाहरण होते. म्हणजे पुढे काय घडणार, ते पाचही परीक्षकांना एवढे अँटीसिपेटेड होते की, त्यातली प्रत्येक फ्रेम ते आजही सांगू शकतील, इतके ते सिनेमॅटिक होते.
हल्ली सिनेमाच्या लँग्वेजला अनुसरून एकांकिकेत माँटाजेस पेरले जातात. का? ते माहीत नाही. पण परिणाम साधायला लेखनतंत्रातला हा डिव्हाईस नाटक या माध्यमाचा नाही. एखाद्या एकांकिकेत तो प्रयोग म्हणून यशस्वी झाल्यावर ‘एम.डी. इफेक्ट’ म्हणून तो वाईट रुजला आहे. माॅब प्लेचे बदललेले तंत्र प्राथमिक फेरीपासून विकसित करणे म्हणजे लेखनक्रांतीच…! म्हणजे प्राथमिक फेरीसाठी १५-२० मिनिटांच्या इंप्रोव्हायजेशनसाठी ४०-५० कलाकारांच्या वापरामुळे कळून चुकले की, मराठी नाटकाचे बाळकडू किती प्राथमिक अवस्थेपासून दिले जाते.
‘हू इज द कल्प्रिट’ ही नवजात बाळाच्या गळ्याला नख लावणाऱ्या आईचे इन्व्हेस्टिगेशन होते. यातही स्टेजभर फिरणारा इन्स्पेक्टर बहुदा लेखकाला शोधत होता. ‘माझा पक्ष…पितृपक्ष’ ही एकांकिका हे वाक्य ज्या राजकारण्याने उच्चारलेय, त्यांच्या भाषणाइतकीच बडा घर पोकळ वासा होती. लेखकाला जे सांगायचेय ते टिचभर आणि बोंब गावभर मारल्यामुळे बरेच प्रेक्षक या वेळात मम्मम करून आले. ‘अ टेल आॅफ टू’ या एकांकिकेला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. पुण्यातून आलेल्यांना रिकाम्या हाती कसे पाठवायचे? हे मुंबईकर परीक्षकांचे टेम्परामेंट पुणेरी सृजनांचा (रंगकर्मींचा नव्हे) फाजिल आत्मविश्वास वाढवते.
कित्येक वर्षांनी ग्रीप्स थिएटरचा आविष्कार या एकांकिकेतून पहाता आला. ग्रीप्स थिएटर पुण्यातूनच पिंजरा तोडून चवताळलेल्या वाघासारखं मला बघा, मला बघा करतं फिरलं आणि शेवटी कुठल्याशा पिंजऱ्यात गुडूप झालंय कोण जाणे ? या एकांकिकेला बालनाट्य म्हणणे म्हणजे लेखकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूमधून परीक्षण करणाऱ्यांचा अवमान करण्यासारखे आहे. शेवटची एकांकिका ‘खूप लोक आहेत’ मात्र लिखाणाचा क्रिएटिव्ह थॉट देऊन गेली. कोविड आजाराचा विसर आता जवळपास सर्वांना पडत चाललाय. आपण हे संकट इतकं लाईटली घेतलंय की त्याबाबतची मानसिकता, लस, उपचार, घरादारांची नात्यांची झालेली धुळधाण ‘सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या डार्विनच्या सिद्धांतापर्यंत रिव्हर्स गेलीय. स्पर्धेत वेगळेपण सिद्ध करणारी ही एकमेव एकांकिका होती. परंतु या एकांकिकेला सांघिक पारितोषिक का नाही? याबाबत दोन मान्यवर परीक्षकांशी चर्चा केल्यावर कळले की, या एकांकिकेचे लिखाण शेवटच्या एक तृतीयांश भागात भरकटले. कट् टू…
‘मानाचि’ ही लेखकांनी लेखकांसाठी राबविलेली चळवळ, उपक्रम किंवा एक संघटन आहे. इथे जर लेखक रुजवले जातात, तर या स्पर्धेने मात्र पाचही लेखक जगतील हे धोरण राबवलेय, असे अजिबात म्हणता येणार नाही. ६ एप्रिलपासून ६ मेपर्यंतच्या एका महिन्यात या पाचही संहितांवर किती एस्टॅब्लिश्ड लेखकांनी या नवलेखकांना मार्गदर्शन केले? अगदी अंतिम फेरीपर्यंत परीक्षकांमधे किती लेखक होते? कलाकारांना आणि दिग्दर्शकांना लेखकाचे म्हणणे डायरेक्ट स्पर्धेच्या अंतिम प्रयोगातून कळते? आणि जर कळत असेल तर सादरीकरण तंत्र ही लेखकांना शिकवावे का? लेखकांच्या भल्यासाठी लेखकांबरोबर कलाकार आणि दिग्दर्शकसुद्धा योगदान देत असतो, असे तर नाही ना सुचवायचे?
कट् टू…
लेखक सन्मान संध्येचे ८व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मानाचिने सुरेश खरे यांना लेखन कारकीर्द पुरस्कार आणि लेखन क्षेत्रात विविध अंगानी लिखाण करणाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. राजीव जोशी यांचे अर्थकारणविषयक लेखन, गणेश गारगोटे यांचे जनसंपर्कीय लेखन किंवा विजय कदम यांना गणेशोत्सवातील आरास कॉमेंट्री लेखनाबद्दलच्या सातत्यास दिले गेलेले पुरस्कार ‘मानाचि’ या संघटनेला एका वेगळ्या आणि उच्च स्थानावर नक्कीच नेऊन ठेवले आहे. कट् टू..
मुंबईत लेखकांसाठी दोन चार संस्था दरवर्षी लेखन उपक्रम राबवत असतात. पैकी प्रेमानंद गज्वीनी ‘बोधी’ संस्थेद्वारे आजवर महाराष्ट्रभर घेतलेल्या ३६ नाट्यलेखन कार्यशाळा, विशाखा कशाळकरांचा लेखन संहिता वाचनाचा उपक्रम, माझा स्वतःचा गेली ८ वर्षे घेण्यात येणारा वाचा, चर्चा, प्रयोग संध्या हा सप्ताह आदी लेखक घडून धडपडावेत या साठीच्या या चळवळी आहेत. ‘मानाचि’ लेखक संघटना गेली आठ वर्षे लेखक तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. या त्यांच्या उपक्रमाबाबत अभिनंदन करणेही तितकेच जरुरीचे जितकी एकांकिका स्पर्धेबाबत टीका..!