Thursday, December 12, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सअमेरिकेतील ‘मराठी’ शाळा

अमेरिकेतील ‘मराठी’ शाळा

फिरता फिरता – मेघना साने

महाराष्ट्रात आपण मराठी शाळा असा उल्लेख करतो, तेव्हा आपल्याला ‘मराठी माध्यमाच्या’ शाळा असे अभिप्रेत असते. परंतु अमेरिकेतील मराठी शाळा वेगळ्या आहेत. इंग्रजी शाळेत जात असलेल्या मुलांना मराठी भाषा शिकविण्यासाठी शनिवार, रविवार चालविलेल्या या शाळा असतात. या शाळांमध्ये काही पालकांनी शिक्षकांची भूमिका स्वीकारलेली असते. अर्थातच ते ही भूमिका सेवाभावी वृत्तीने पार पाडतात.

साठ-सत्तरच्या दशकात मराठी वंशाचे लोक भारतातून अमेरिकेत नोकरीनिमित्त व व्यवसायानिमित्त गेले आणि तेथेच स्थायिक झाले. मराठी भाषिकांना एकत्र आणून अमेरिकेत पहिले महाराष्ट्र मंडळ, शिकागो येथे १९६९ साली स्थापन झाले. त्यानंतर इतर ठिकाणीही महाराष्ट्र मंडळे स्थापन होऊन मराठी भाषिकांचे भाषेचे आदान-प्रदान वाढू लागले.

पण प्रश्न आला तो अमेरिकेत जन्मलेल्या मराठी वंशाच्या मुलांच्या भाषेचा. पुढच्या पिढीची ही मुले अमेरिकन शाळेत शिकत होती. अमेरिकेतील पाळणाघरात ठेवली जात होती. त्यामुळे त्यांच्यावर इंग्रजी संस्कार होऊ लागले. आठ-दहा वर्षांची मुले मराठी संस्कृतीपासून खूपच दूर गेलेली वाटत होती. कधी भारतात गेल्यावर, त्यांच्या नातलगांशी नीट संवादही करत नव्हती. आजी- आजोबांच्या गोष्टी तरी यांना कशा समजाव्या? आपल्या मुलांना नातलगांचे प्रेम मिळावे, यासाठी काही तरी पूल तयार व्हायला हवा होता.

त्यानुसार काहींनी मुलांना मराठी शिकवण्यासाठी आपापल्या घरातच शाळा सुरू केली. १९७९ साली सुधा टोळे आणि श्रीमती कदम यांनी न्यू जर्सीत पहिली मराठी शाळा सुरू केली. त्यानंतर काही वर्षांच्या अंतराने इतरही ठिकाणी मराठी शाळा सुरू होऊ लागल्या.

स्नेहल वझे यांनी पुढाकार घेऊन शनिवार, रविवारच्या सुट्टीत आपल्या आणि मैत्रिणीच्या मुलांना एकत्र आणून आपल्या घरातच खेळीमेळीच्या वातावरणात मराठी शिकवायचे ठरवले. हळूहळू या उपक्रमाला यश येऊ लागले. तिच आजची न्यू जर्सीमधील ‘मॉर्गनव्हील मराठी शाळा.’

साउथ ब्रुन्सवीक मराठी शाळा १९९३च्या दिवाळी पाडव्याच्या दिवशी स्थापन झाली. आल्हाद साठे यांनी आपल्या मुलांबरोबर इतरही मुलांना मराठी शिकवण्यास सुरुवात केली. या शाळेत आता पाच ते पंधरा वर्षांची मुले आहेत. अक्षर ओळख, मराठी वाचन आणि बोलणं यांवर भर दिला गेला. कथाकथन, नाट्यसादरीकरण यातून या शाळेतील मुलांची बऱ्यापैकी प्रगती झाली. मराठी संस्कृतीबरोबर अमेरिकन सण देखील या शाळेत साजरे केले जातात. सध्या ही शाळा लायब्ररीमध्ये भरते. तिला अनेक स्वयंसेवक लाभले आहेत.

एडिसन, न्यू जर्सी येथे मराठी शाळा आहे. कोविड काळात २०२०-२१ साठी ही शाळा ऑनलाइन सुरू होती. एडिसन मराठी शाळा ही शिक्षक पालक यांच्या स्वयंसेवी संघटनेवर चालते. शाळेचे वर्ग सप्टेंबर ते जून ह्या शालेय वर्षात, दर रविवारी Jewish Community Center(JCC), एडिसन, न्यू जर्सी येथे भरतात. तीन-चार विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या मराठी शाळेत, या वर्षी नव्वद विद्यार्थी शिकत आहेत.

२००७च्या आसपास बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या लक्षात आले की, या शिक्षणाला काही स्तर असावा. म्हणून हे उद्दिष्ट साधण्यासाठी त्यांनी नेमलेल्या समितीतील सुनंदा टूमणे आणि विजया बापट यांनी मेहनत करून शाळांसाठी अभ्यासक्रम बनवला. या अभ्यासक्रमात अमेरिकेतील रोजच्या जीवनातील आणि मुलांच्या ओळखीचे संदर्भ घेतले होते. २००९-१०च्या दरम्यान लीना देवधरे यांना भारती विद्यापीठ पुणे, यांची मान्यता मिळविण्यात यश आले. त्यामुळे नॉर्थ अमेरिकेतील बहुतांशी मराठी शाळा आता बी. एम. एम.चा अभ्यासक्रम अनुसरतात.

नॉर्थ कॅरोलायना येथे १९९४ मध्ये ‘विद्या मंदिर’ नावाची मराठी शाळा स्थापन झाली होती. ती विनोद बापट आणि विजया बापट यांनी स्थापन केली होती.

शिकागो येथे २०१४ मध्ये मराठी शाळा स्थापन झाली. विद्या जोशी या शाळेच्या कॉर्डिनेटर होत्या. त्यांनी शाळेला चांगले नावारूपाला आणले. तेथे आज शंभरच्यावर विद्यार्थी असून, ही शाळा दोन बॅचेस मध्ये चालते. या शाळेला इलिनॉईस स्टेट ऑफ बोर्डकडून मान्यता मिळाली आहे. मराठी भाषेच्या परीक्षेचे मार्क हायस्कूल ॲडमिशनसाठी ग्राह्य धरले जातात. याशिवाय अटलांटा येथील मराठी शाळा २००९ साली स्थापन झाली आहे. आधी ‘किलबिल’चे वर्ग आणि त्यानंतर वरच्या वर्गांमध्ये बी. एम. एम. चे अभ्यासक्रम लागू होतात. या शाळेला सुद्धा जॉर्जिया स्टेटकडून मान्यता मिळाली आहे.

न्यूजर्सीमध्ये एकूण पाच मराठी शाळा नावारूपाला आल्या आहेत. तसेच इतरही काही शाळा आहेत. २०२३च्या ऑक्टोबरमध्ये कार्यक्रमाच्या दौऱ्याच्या निमित्ताने मी आणि माझे पती हेमंत साने, न्यू जर्सी येथे राहिलो होतो. तेव्हा न्यू जर्सीच्या एडिसन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका मेधा राजामनूर यांचे आम्हाला आमंत्रण आले. पालकांच्या उपस्थितीतच मी मुलांना गोष्टी सांगितल्या. हेमंत साने यांनी स्वतः संगीत दिलेली बालगीते म्हणून दाखविली व मुलांकडून म्हणूनही घेतली.

न्यू जर्सी येथील ब्रिजवॉटर मराठी शाळेच्या शिक्षिका नूतन यांनी एका पालकाच्या घरी आमच्या भेटीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी एक छोटेखानी शिबीर आयोजित केले. तिथेही आम्ही विद्यार्थ्यांसाठी गाणी, गोष्टी, निवेदन यांचा
तास घेतला.

अशा तऱ्हेने मराठी भाषा आणि मराठी संस्कृती अमेरिकेत जन्मणाऱ्या पुढील मराठी पिढ्यांकडेही उत्तमरीत्या संक्रमित होत आहे, ही समाधानाची बाब आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -