Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीकाँग्रेसकडून कसाबचे समर्थंन हे देशासाठी धोकादायक

काँग्रेसकडून कसाबचे समर्थंन हे देशासाठी धोकादायक

पंतप्रधान नरेंद्र मोदींने ओढले काँग्रेसच्या पाकिस्तानधार्जिण्या भूमिकेवर आसूड

नगर : मुंबईवर झालेल्या २६/११ सागरी हल्ला प्रकरणी काँग्रेसचे नेते पाकिस्तानची घेत असलेली बाजू हा मुंबई हल्ल्यातील सर्व निर्दोष नागरिकांचा अपमान आहे. हा मुंबई हल्ल्यात सर्व दहशतवाद्यांना मारणाऱ्या सुरक्षा दलाचा हा अपमान आहे. शहीद तुकाराम वांजळे सारख्या सर्व शहिदांचा हा अपमान आहे. काँग्रेस देशाला कोणत्या बाजूला घेऊन जात आहे? २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्या संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांचे वक्तव्य अतिशय धोकादायक आहे. आता काँग्रेस पक्षातील नेते दहशतवादी कसाबची बाजू मांडत असल्याचे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या पाकिस्तानधार्जिणी भूमिकेवर आसूड ओढले आहेत.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते.

काँग्रेसची बी टीम ॲक्टिव्ह झाली असून सीमेच्या पलीकडून ट्विट केले जात आहे. त्या बदल्यात काँग्रेसचे नेते पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्यातून क्लीन चीट देण्याचे काम करत आहेत. मुंबईमध्ये झालेला २६/११चा हल्ला पाकिस्तानने केलेला हल्ला होता. आपल्या जवानांना दहशतवाद्यांनी शहीद केले होते. आपल्या निर्दोष नागरिकांची हत्या दहशतवाद्यांनी केली होती, सर्व जगाला माहिती आहे. न्यायालयानेही या विषयावर निर्णय दिला आहे. इतकेच नाही तर पाकिस्ताननेही दहशतवादी हल्ला झाल्याचे मान्य केले आहे. या दहशतवाद्यांचे फोन रेकॉर्ड उपलब्ध आहेत. असे असताना काँग्रेस पक्षाचे नेते आता दहशतवाद्यांना निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र जाहीर करत असल्याची टीका करत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र ज्यांनी दिला, त्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतो. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनाही कोटी कोटी अभिवादन करतो. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील प्रचार सभेला मराठीतून सुरुवात केली.

तुष्टीकरण करण्याच्या नादात काँग्रेस आपली पातळी खाली आणत आहे. कसाबला समर्थंन देणाऱ्या काँग्रेसला महाराष्ट्रात एकही जागा मिळायला नको. काँग्रेस आणि त्यांचे सहकारी खतरनाक खेळ खेळत असल्याचे मी अनेक दिवसापासून सांगत होतो. आता इंडिया आघाडीच्या एका मोठ्या नेत्याने या खतरनाक खेळावरुन पडदा काढला आहे. जो नेता आताच तुरुंगातून बाहेर आला आहे. तो नेता म्हणजे लालूप्रसाद यादव असून त्यांनी देशात इंडिया आघाडीचे सरकार आले तर मुस्लिमांना आरक्षण देणार असल्याचे जाहीर केले आहे. इतकेच नाही तर ते मुस्लिमांना पूर्ण आरक्षण देणार असल्याचा दावा लालूप्रसाद यादव यांनी केला असल्याचे मोदी म्हणाले.

वास्तविक देशात एससी, एनटी, ओबीसी या समाजाकडे पूर्ण आरक्षण आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडी हे पूर्ण आरक्षण काढून मुसलमान समाजाला देणार असल्याचे सांगत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या माध्यमातून केवळ स्वत:च्या मतदारांना खुश करण्याचे काम इंडिया आघाडी करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. जे काम करण्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थांबवले होते, तेच काम त्यांना करायचे असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास संविधानाने मनाई केली आहे. तरी देखील ते संविधान बदलायचे असल्यामुळेच अशा पद्धतीने आरक्षण देण्याची भाषा काँग्रेस करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

निवडणुकीच्या पूर्वी जो भानुमतीचा कुणबा एकत्र आला होता. हा कुणबा ४ जूननंतर वाळूच्या किल्ल्याप्रमाणे संपणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावेळेस निवडणूक ही संतुष्टीकरण आणि तृष्टीकरण यांच्या दरम्यान होत आहे. एनडीए मेहनतीच्या माध्यमातून संतुष्टीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे नेते तृष्टीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

काँग्रेस पक्षाने जाहीर केलेला जाहीरनामा हा पूर्णपणे मुस्लिम लीगचा जाहीरनामा असल्याचा दावा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. भाजपा आणि एनडीएतील घटक पक्षातील जाहीरनाम्यात कोणते मुद्दे देण्यात आले आहेत, हे पहा. विकास, गरीब कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा स्वाभिमान, देशाचा सन्मान हे सर्व एनडीएच्या जाहीरनाम्यातील मुद्दे असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यातील एकाही मुद्द्यावर काँग्रेस बोलत नसल्याचा आरोप नरेंद्र मोदी केला आहे.

काँग्रेसने ५० वर्ष गरिबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले होते. गरिबांसोबत काँग्रेसने सर्वात मोठा विश्वासघात केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्याला विरोध केला होता. त्या जाती आधारीत आरक्षण देण्याची भाषा काँग्रेस करत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

निळवंडे धरणाचा वाढलेला खर्च हे पाप काँग्रेसचेच

काँग्रेसने शेतकऱ्यांना संकटात ढकलले आहे. नगर जिल्ह्यातील निळवंडे १९७० मध्ये धरणाचे काम सुरू झाले आहे. त्यावेळी धरण बनवण्यासाठी ८ कोटी किंमत होती त्याची किंमत आता ५ हजार कोटी झाली. हे पाप काँग्रेसने केले आहे.निळवंडे धरणातून शेतकऱ्यांच्या हजारो एकर शेती सिंचनाखाली येणार आहे.मोदी सरकारचे प्रथम प्राधान्य शेतकरी आहेत.मोदी सरकारच्या काळात ऊस उत्पादकांना अधिक पैसे मिळाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -