Thursday, July 25, 2024
Homeसाप्ताहिककोलाजमहाभारतातील ज्ञानकर्ण

महाभारतातील ज्ञानकर्ण

विशेष: भालचंद्र ठोंबरे

अर्जुन युधिष्ठिरचा वध करण्यास निघतो, तेव्हाचा कौरव पांडवांमधील महाभारताच्या युद्धाचा १७वा दिवस. द्रोणाचार्याच्या मृत्यूनंतर कर्ण कौरव सैन्याचा सेनापती झाला होता. त्याने आपल्या पराक्रमाने पांडवाच्या सैन्याला त्राहीत्राही करून सोडले. अशातच त्याचा सामना युधिष्ठिराशी झाला. युधिष्ठिराशी झालेल्या युद्धात कर्णाने युधिष्ठिराला जखमी व पराभूत केले व त्याचा वध करणार, मात्र त्याचवेळी त्याला कुंतीला दिलेल्या वचनाची आठवण झाली.

कुंतीने कर्णाला तुही माझाच मुलगा व पांडवांचा ज्येष्ठ बंधू असल्याचे सांगून, आपल्या बंधूंना न मारण्याची विनंती केली होती. त्यावेळेस कर्णाने कुंतीला तुझे पाचही पुत्र जिवंत राहतील, मात्र त्यात एक तर अर्जुन असेल अथवा कर्ण असे वचन दिले होते. कर्ण हा कुंतीला लग्नाआधी झालेला पुत्र होता. तेव्हा पराभूत झालेल्या युधिष्ठिराला कर्णाने जीवदान दिले. अपमानित झालेला युधिष्ठिर रणांगणावरून शिबिरात परतला.

इकडे युद्ध भूमीवर युधिष्ठिर न दिसल्याने चौकशी करता, युधिष्ठिर शिबिरात निघून गेल्याचे अर्जुनाला कळले. तेव्हा परिस्थिती जाणून घेण्यासाठी अर्जुन युधिष्ठिराच्या शिबिरात आला. अर्जुन आपला अपमान करणाऱ्या कर्णाचा वध करूनच आला असावा, अशा समजुतीने युधिष्ठिराने त्याला त्याबाबत विचारणा केली. मात्र या सर्व घटनेपासून अनभिज्ञ असलेल्या अर्जुनाने “आपण युद्ध भूमीवर न दिसल्याने, आपली स्थिती जाणून घेण्यासाठीच, मी आलो असल्याचे सांगितले.” त्यावर चिडून युधिष्ठिर अर्जुनाला म्हणाले की, “तू येथे माझ्या जखमांची चौकशी करण्यास आला आहेस की, त्यांना कुदरण्यास आला आहेस.

आपल्या ज्येष्ठ बंधूच्या अपमानाचा तू बदला घेऊ शकत नसशील, तर तुझे गांडीव धनुष्य काय कामाचे फेकून दे ते.” हे ऐकताच अर्जुन तलवार उपसून, युधिष्ठिराचा वध करण्यास धावला. कारण जो आपल्या गांडीवाचा अपमान करेल, त्याचा मी वध करीन, अशी प्रतिज्ञा अर्जुनाने केलेली असते. तेव्हा कृष्णाने अर्जुनाला अडविले. मात्र आपण प्रतिज्ञाबद्ध असल्याचे अर्जुनाने सांगितले. तेव्हा कृष्णाने अर्जुनाला तू युधिष्ठिराचा एकेरी उल्लेख करून त्याची निंदा कर, असा सल्ला दिला. कारण ज्येष्ठाचा एकेरी उल्लेख करून अपमान करणे, हे त्या ज्येष्ठासाठी मृत्यू समान असते.

तेव्हा अर्जुनाने युधिष्ठिराला ‘अरे तुझ्यामुळेच आज हे युद्ध होत आहे. तुझ्या द्यूत खेळण्याच्या हौसेनेच पांडवाचे सर्व नष्ट झाले असून, ही युद्धाची स्थिती उद्भवली आहे. अशा अनेक अपमान जनक बोलल्याने, अर्जुनाचा राग शांत झाला. मात्र आता मोठ्या भावाचा असा अपमान केल्याने, आत्मग्लानी येऊन तो उदास झाला व त्यातच त्याने आत्मघाताचा निर्णय घेतला. मात्र शास्त्रानुसार हा अधर्म असून पांडवानी अधर्माच्या मार्गाने जावे हे गैर ठरेल. तेव्हा आता यावर परिमार्जन म्हणून कृष्णाने अर्जुनाला आत्मस्तुती करण्यास सांगितले. अर्जुनाने तसे करताच तो शांत झाला. अशा प्रकारे कृष्णाने दोघांनाही एका धर्मसंकटातून टाळले.

तात्पर्य : ज्येष्ठाचा कनिष्ठाकडून एकेरी उल्लेखासह झालेला अपमान हा ज्येष्ठासाठी मृत्यू समान असतो, तसेच आत्मस्तुतीही आत्मघाता समान असते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -