Monday, July 22, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखपाकिस्तानला काँग्रेसचा पुळका

पाकिस्तानला काँग्रेसचा पुळका

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना पाकिस्तानचे आपल्या निवडणुकीतील स्वारस्य उघड केले. काँग्रेसच्या राजपुत्राला अर्थात राहुल गांधींना पंतप्रधान बनविण्यासाठी पाकिस्तान का आतुर आहे? तेच समजत नाही. मुळातच देशाच्या स्वातंत्र्यापासून पाकिस्तानने आजपर्यंत भारताच्या हानीचाच विचार केला आहे. त्यामुळे पाकिस्तान ना आपला मित्र आहे, ना आपला हितचिंतक आहे. ज्या देशाने वर्षातील बाराही महिने व दिवसातील २४ तास भारताच्या नुकसानीचाच विचार केला आहे, त्या पाकिस्तानने भारतातील निवडणुकांमध्ये स्वारस्य दाखविणे, ही भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

भारतातील निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे स्वारस्य दाखविण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही. पाकिस्तानने राहुल गांधींना पंतप्रधान बनविण्याविषयी स्वारस्य दाखविणे म्हणजे काँग्रेस व पाकिस्तान यांच्यामध्ये कनेक्शन खरोखरीच आहे का? याबाबत कोणालाही शंका निर्माण होणे स्वाभाविकच आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये देशामध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यापासून पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया पूर्णपणे थंडावल्या आहेत. जम्मू-काश्मीर, पंजाब एकेकाळी दहशतवादी कारवायांचे माहेरघर बनले होते.

महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईतही सागरी मार्गाने पाकिस्तानने केलेला दहशतवादी हल्ला कोणताही मुंबईकर विसरू शकणार नाही. देशाच्या स्वातंत्र्यापासून १९४७, १९६५, १९७१ साली पाकिस्तानने उघडपणे आपणाशी युद्ध पुकारले होते. भारताने प्रत्येक निवडणुकीत पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्यावर भारताशी उघडपणे युद्ध जिंकणे शक्य नसल्याचे पाकिस्तानला कळून चुकले होते. त्यामुळे भारताशी यापुढे उघडपणे न लढता छुपे युद्ध करून भारताला खिळखिळे करण्याचा पाकिस्तानने २०१४ पर्यंत आटोकाट प्रयत्नही केला होता आणि त्यात पाकिस्तानला यशही मिळाले होते; परंतु २०१४ ला मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर हे चित्र बदलले. मोदींना जे १० वर्षांत शक्य झाले, ते काँग्रेसला ५०-६० वर्षे देशाचा कारभार हाकताना का शक्य झाले नाही? हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होणे स्वाभाविकच आहे.

पाकिस्ताननेच भारतातील दहशतवादाला खतपाणी घातले. पंजाब इतकी वर्षे अशांत होता. स्वतंत्र पंजाबची मागणी केली जात होती. जम्मू-काश्मीरमध्ये १९४७ पासून ते २०१३ पर्यंतच्या ६६-६७ वर्षांतील घडामोडी पाहिल्यावर जम्मू-काश्मीर कधी शांत होईल, तेथे शांतता नांदेल असा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल, पण आज ते शक्य झाले आहे. मोदी राजवटीत जम्मू-काश्मीर पुन्हा पृथ्वीवरील नंदनवन होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानची स्फोटक परिस्थिती पाहिल्यावर ही दोन राज्ये कधीही एकतर स्वतंत्र होतील अथवा पाकिस्तानात विलीन होतील, इतके भयावह वातावरण त्या दोन राज्यांमध्ये सतत होते.

तब्बल पाच-सहा दशके देशात व राज्यात अमर्याद सत्ता उपभोगल्यावरही देशातील प्रश्न सोडविण्यास काँग्रेसला अपयश आले. समस्या सुटल्या तर नाहीच, पण नियंत्रणात ठेवणेही काँग्रेसला जमले नाही. उलट त्या समस्यांचा दिवसागणिक भस्मासूर वाढतच गेला. कोणतेही कार्य करण्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते. ती इच्छाशक्ती नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याने जे काँग्रेसला सत्तेवर असताना ५०-६० वर्षांत जमले नाही, ते मोदींना अवघ्या १० वर्षांत करणे शक्य झाले. भारताला खिळखिळे करणे, कमजोर करणे, भारतात दहशतवादी कारवायांना सतत खतपाणी घालणे, समाजविघातक कारवायांनी राज्याराज्यांमध्ये अशांतता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे हीच कामे करण्याला पाकिस्तानने आजवर प्राधान्य दिले आहे.

केवळ दहशतवादी कारवाया, गोळीबार, बॉम्बस्फोट, सैनिकांची हत्या यापुरते पाकिस्तानचे उद्योग सीमित न राहता वर्षानुवर्षे भारतीय अर्थव्यवस्थेला खिळखिळे करण्याचेही काम पाकिस्तानने आजवर प्रामाणिकपणे केलेले आहे. देशातील चलनात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा पसरविण्यात पाकिस्तानचा हात असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे. बनावट चलनामुळे भारताचे आजवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले आहे. खऱ्या नोटांसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या बनावट चलनी नोटा भारतीय बाजारांमध्ये पसरवून भारतीय अर्थव्यवस्थेसोबत भारताच्या विकासालाही खीळ बसविण्याचा पाकिस्तानने आजवर प्रयत्न केला आहे. ज्याप्रमाणे कारले आपला कडूपणा सोडू शकत नाही, तसेच पाकिस्तानही भारताबद्दलचा द्वेष कधीही सोडू शकत नाही.

पाकिस्तानने भारताबरोबर संबंध सुधारण्याचा कितीही आव आणला तरी त्यावर कोणीही सहजासहजी विश्वास ठेवू शकत नाही. संबंध सुधारणेचा बुरखा पांघरून भारताचे करता येईल तितके वाईट करण्याचा प्रयत्न पाकिस्तान नेहमीच करत राहणार, यात काहीच शंका नाही. काँग्रेसला पाकिस्तानचा बिमोड करणे का शक्य झाले नाही? केंद्रात सत्ता होती. लष्कर ताब्यात होते, सर्वकाही असतानाही पाकिस्तानकडून निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढणे पाकिस्तानला का शक्य झाले नाही? मुळात भारतद्वेष करता करता पाकिस्तान आज कंगाल झाला आहे. भिकेला लागला आहे. ज्यांच्याकडून कर्ज घेतले आहे, त्यांचे व्याज फेडणेही आता पाकिस्तानला शक्य होत नाही. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. आपल्याला त्यांच्याशी काही देणे-घेणे नाही.

आज त्यांची जी अवस्था आहे, त्याला तेच जबाबदार आहेत. त्यांच्या कर्माची ते फळे भोगत आहेत, असे म्हटले तर त्यात वावगे काही ठरणार नाही; परंतु पाकिस्तानला काँग्रेसचा विशेषत: राहुल गांधींचा निवडणूक काळात पुळका येणे ही बाब देशाच्या ऐक्यासाठी धोकादायक आहे. जो देश आपल्याला संपवू पाहत आहे, त्यांना राहुल गांधींबाबत प्रेम निर्माण होणे याचा भारतीयांनी विचार करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हीच गोष्ट देशवासियांना प्रचाराच्या माध्यमातून सांगत आहेत. काँग्रेस विशेषत: राहुल गांधींचे काही पाकिस्तान कनेक्शन आहे का, अथवा नाही याचा काँग्रेसकडून देशवासियांसमोर खुलासा होणे आवश्यक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -