आमदार नितेश राणे यांची जहरी टीका
मुंबई : भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सर्वांना महाराष्ट्र दिन (Maharashtra day) व कामगार दिनाच्या (Labour day) शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर सिंधुदुर्गाचाही (Sindhudurg) स्थापना दिवस असल्याने त्यांनी सर्व सिंधुदुर्गवासियांना शुभेच्छा दिल्या. यानंतर त्यांनी भाजपा नेत्यांना महाराष्ट्रद्रोही म्हणणार्या, मराठी माणसाविषयी बोलणार्या ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व संजय राऊतांचा (Sanjay Raut) खरपूस समाचार घेतला. ‘उद्धव ठाकरेंनी हुतात्मा चौकाला भेट दिल्यानंतर तिथे गोमूत्र शिंपडलं पाहिजे’ अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली.
नितेश राणे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं तिथे काल रात्री मुंबईत उद्धव ठाकरेंनी जाऊन अभिवादन केलं. ज्या नेहरुंनी पंतप्रधान असताना या पूर्ण लढ्याला विरोध केला, असंख्य मराठी माणसांच्या ते जीवावर उठले होते, त्याच नेहरुंच्या, गांधींच्या मांडीवर बसणारे हेच उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत आज मराठी माणसांचं हित आणि अस्मिता यांबद्दल आम्हाला शिकवत आहेत. मी तर मागणी करेन की, उद्धव ठाकरेंनी त्या हुतात्मा चौकाला भेट दिल्यानंतर तिथे गोमूत्र शिंपडलं पाहिजे आणि परिसर स्वच्छ केला पाहिजे.
याच उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतने असंख्य मराठी माणसांना बेघर केलं आहे, त्यांना संपवलं आहे. पत्राचाळ हे याचं फार मोठं उदाहरण आहे. ज्यामुळे संजय राऊतचे नातेवाईक आज जेलमध्ये जात आहेत, त्यांच्यावर ईडीच्या कारवाया सुरु आहेत. उद्धव ठाकरेने असंख्य मराठी माणसांच्या जमिनी हडपल्या, त्यांना बेघर केलं, तरुणांना बेरोजगार ठेवलं. त्या दोघांना आमच्या मोदीसाहेबांना आणि आमच्या भाजपा नेत्यांना महाराष्ट्रद्रोही म्हणताना लाज वाटली पाहिजे. हिंमत असेल तर पत्राचाळमध्ये उभा राहून दाखव, नाही तुझा हुतात्मा तिथे झाला तर नाव बदलेन, असं खुलं आव्हान नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिलं.
उद्धव ठाकरे नव्हे वांग्या ठाकरे
उद्धव ठाकरेंनी काल एका सभेमध्ये आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना नावं ठेवली. ते स्वतः एका सडलेल्या, वाकलेल्या वांग्यासारखे दिसतात. या वांग्या ठाकरेला सांगेन की, तू इतरांना नावं ठेवू नकोस. कारण नावं ठेवण्याच्या स्पर्धेत आम्ही तुझे बाप आहोत. त्यामुळे परत फडणवीस साहेबांना नावं ठेवशील तर भर सभेमध्ये तुला अशी नावं ठेवेन की तू परत तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाहीस, असं नितेश राणे म्हणाले.
महाविकास आघाडीत सगळे महाराष्ट्रद्रोही
आज महाराष्ट्रदिनी, हे सगळे महाराष्ट्रद्रोही, औरंग्याची आणि टिप्या सुलतानची पिल्लावळ जे दाढी कुरवाळत महाविकास आघाडीच्या नावाने फिरतायत, त्यांना महाराष्ट्रातून हाकलून देण्याचं काम आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत. या लोकांवर महाराष्ट्राला लुटण्याचे आरोप आहेत. जेव्हा देशाची जनता कोविडमध्ये होरपळत होती तेव्हा हे भ्रष्टाचार करुन खिसे भरण्याचे काम करत होते, असा आरोप नितेश राणे यांनी केला.
मुंबईतील मराठी माणूस कमी होण्यामागे उद्धव ठाकरे
मुंबईतील मराठी माणसाचा टक्का कमी करण्याची सुपारीच या उद्धव ठाकरेने घेतली होती. त्याच सुपारीच्या पैशांवर याने मातोश्री १ आणि मातोश्री २ बांधली आहे. आज मुंबईचा मराठी माणूस नालासोपारा, कल्याण, डोंबिवलीला राहायला गेला आहे. आणि याच्या मातोश्री १ चं मातोश्री २ कसं झालं? लंडनचं घर कसं झालं? नंदकिशोर चतुर्वेदीकडे करोडोंचा पैसा कसा आला? मुंबईतल्या मराठी माणसाच्या हातात आजही वडापाव का दिला जातो? तुझी मुलं बीफ सँडविचशिवाय काही खात नाहीत. मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांचं एक-दोन लाखांचं दारुचं बिल होतं, मग तुम्ही मराठी माणसांच्या नावाने आम्हाला सुनावता? असं नितेश राणे यांनी खडसावलं.