Tuesday, June 17, 2025

Balayogi Maheshwarananda : मठामध्ये सेवेकरी महिलेचा खून केल्याचे बिंग फुटल्याने महंत फरार

Balayogi Maheshwarananda : मठामध्ये सेवेकरी महिलेचा खून केल्याचे बिंग फुटल्याने महंत फरार

कोल्हापूर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात नवरात्र उत्सवात छातीवर घटस्थापना करुन प्रसिद्धी मिळवलेल्या एका स्वयंघोषित महंताचा खरा चेहरा उघडकीस झाला आहे. कोल्हापूर येथील मठामध्ये सेवेकरी महिलेचा खून केल्याचे बिंग फुटल्याने हा ढोंगी बाबा सध्या फरार झाला आहे. बालयोगी महेश्वरानंद (Balayogi Maheshwarananda) असे या बाबाचे नाव आहे. महेश अर्जुन माने हे त्याचे मूळ नाव आहे.


गेल्यावर्षी नवरात्रोत्सव काळामध्ये या बाबाने तब्बल महिनाभर श्रीरामपूरमध्ये वास्तव्य देखील केले. विविध पक्षांचे नेते आणि लोकप्रतिनिधी या बाबाचे भक्त आहेत. मात्र या ढोंगी बाबाचा खरा चेहरा उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरमध्येच राहणाऱ्या ३४ वर्षीय वैष्णवी लक्ष्मीकांत पवार या महाराजांच्या कोल्हापूर येथील मठामध्ये सेवेकरी होत्या. मयत वैष्णवीचा एका तरुणाशी विवाह जुळवण्यामध्ये या बाबाचा पुढाकार होता. मात्र लग्नापूर्वी वैष्णवी व तिच्या होणाऱ्या नवऱ्याने लिव्ह इन मध्ये राहण्याचा आग्रह धरला होता. त्याला वैष्णवीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. वैष्णवीने धरलेला हट्ट सोडावा यासाठी तिच्या कुटुंबीयांनी तिला महंताकडे नेले. मात्र तरीदेखील मुलीने नकार दिल्याने तिला मठामध्येच मारहाण करण्यात आली आणि यामध्येच तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सेवेकरी, आई व वडील यांनी महंतांच्या सांगण्यावरूनच मारहाण केल्याचा आरोप आहे.


या गुन्ह्याचा कसून तपास केल्यानंतर हा बाबाच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी समोर आणले. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याचे समजताच हा ढोंगी बाबा तेथून पसार झाला आहे. विशेष म्हणजे जे लोकप्रतिनिधी तसेच पुढारी या बाबाच्या चरणी लीन झाले आता त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली आहे.


दरम्यान, या बाबाचे पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथे मठ आहे. त्याचाच भाऊ बालकृष्ण महाराज यांच्यासह तो स्वतः या मठाचे काम पाहतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >