२८ प्रवासी जखमी
बुलढाणा : देशभरात अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असताना अशातच बुलढाण्यामधून भीषण अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खाजगी प्रवासी बस दरीत कोसळून भयंकर घटना घडली. या अपघातात बसमधील २८ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व प्रवासींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदोर येथील रॉयल ट्रॅव्हल्सच्या बसचा बुलढाण्यात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. बुलढाण्यामधील जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात खासगी बस १०० फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. सकाळी बस इंदोर येथून अकोलाकडे जात असताना सुमारे साडे पाच वाजता हा अपघात झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचाव कार्याला सुरुवात केली. बसमधील २८ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर दर्यापूर (मध्यप्रदेश ) व बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.