सेवाव्रती: शिबानी जोशी
वसई-विरार जवळच्या एका गावात विशाल परुळेकर नावाचा विशाल हृदयाचा एक तरुण ‘साई आधार’ चालवतो. आता साई हे नाव आलं म्हणजे हे साईबाबांचं मंदिर आहे, असं वाटू शकतं, पण ते तसं नाही. इथे साई आधार या नावानं अनेक निराधारांना आधार दिला जातो आहे.
विशालची आई त्याच्या वयाच्या सातव्या महिन्यात देवाघरी गेली. वडील व्यसनाधीन, सांभाळ आजीनं केला. तिला जमेल तसं तिनं वाढवलं. वसईत एक साई मंदिर आहे. तिथे मग पडेल, ते काम करायचं, चपला सांभाळायच्या, जमीन पुसायची, हायवेवर मिरची-लिंबूचे आकडे विकायचे, गाड्यांच्या काचा पुसायच्या. त्यातून जे काही पोटाला मिळेल ते खायचं, असं विशालचं आयुष्य सुरू होतं. शेवटचा उपाय म्हणून भीकही त्यांनी मागून पाहिली होती. विशालच्या बरोबरीने अजून तीन-चार मुलं, एक कुष्ठरोगी आणि एक एचआयव्हीबाधित महिला, नवऱ्यानं त्यागलेली, घरादारानं हाकलून लावलेली, भीक मागायला उभे असत. ते विशालचं कुटुंब झालं. ते एकमेकांचं दुःख वाटून घेऊ लागले होते. या सर्वांच्यात विशाल थोडा वेगळा होता. तो अगदी लहानपणी शाखेत गेला होता.
लाखोंच्या मनात, राष्ट्र व धर्म प्रेमींच्या मनात संघाने राष्ट्राभिमान, धर्माभिमान जागृत केला, अनेकांचा आत्मविश्वास जागवला. त्यापैकी विशालदेखील एक, असं तो नेहमी सांगतो. शिवाय अशा नकारात्मक वातावरणात ही त्याची सदसदविवेक बुद्धी जागृत होती. शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं. त्यामुळे त्याही परिस्थितीत विशालनं शिक्षण मात्र सोडलं नव्हतं. म्युनिसिपाल्टीच्या शाळेत शिकायचं, अभ्यास करायचा, हे सुरू होतं. त्याची हुशारी त्याच्या शिक्षकांनी जाणली होती. मानसशास्त्र या विषयावर एक विशेष परीक्षा घेतली जाणार होती, त्या परीक्षेचा विशालचा अर्ज त्या शिक्षकांनी त्याच्या नकळत भरला आणि चमत्कार होता का काय, हे माहीत नाही, पण तो त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. राज्यात सातवा आणि पालघर-ठाणे पट्ट्यात पहिला आला. कुठलंही यश माणसाला सकारात्मक बनवते, विशाल सकारात्मक झाला. त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्या शिवाय सुरुवातीला तो संघ शाखेतही जात असे. या सर्व गोष्टींमुळे समाजसेवा करण्याचा त्याचा निश्चय अधिक दृढ झाला. आजही संघ कार्यकर्त्यांना त्याच्या संस्थेत मानाचं पान असतं.
साई मंदिरानं जणू त्याला व अशाच गरिबांना आधार दिला होता. दिवसभर प्रत्येक जण काही ना काही काम करायला जायचं. मुलं सिग्नलवर गजरे, काकड्या विकायला जायची. रात्री एकत्र यायची. एखादा सर्वसामान्य घरातला तरुण हा आशावादी, तडफदार, उमदा असतो. नुकतीच विशी पार केलेला तरुण आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहण्यात दंग असतो. परंतु विशालला मात्र त्याचा दिवस भागवायची भ्रांत होती, तरीसुद्धा महत्त्वाकांक्षा मोठी होती, जिद्द होती आणि आपल्याबरोबरच इतरांचं दुःख हलकं करण्याची वृत्ती होती आणि त्यातूनच त्यांनी उभं केलं-‘साई आधार केंद्र.’ ज्या माध्यमातून शून्यातून उभारी घेऊन, ऐन तारुण्यात ४० जणांचं कुटुंब चालवण्याचं कार्य विशाल करत आहे.
विशालनं शून्यातून सुरुवात केली होती. हे काम सुरू असतानाच, त्याला जोडीदार ही मिळाली-अंकिता. तीदेखील पतीच्या या आधाराचा आधारस्तंभ बनली आहे. या परिवारात मुलांना बारावीपर्यंत शिक्षण देऊन नंतर शिलाई काम, बांधकाम, नर्सिंग, मोबाईल दुरुस्ती कोर्स करायला देऊन तसेच गरजेपुरते साहित्य विकत घेऊन दिले जाते. त्यानंतर मुले आपली-आपली वाट शोधण्यास परिवारातून बाहेर पडतात. सुरुवातीच्या वर्षांत त्यांना जगाशी दोन हात करण्याची चांगलीच सवय झालेली असते. मग ते आपापले मार्ग जोखण्यासाठी बाहेर पडतात. मुलींना मात्र लग्न होईपर्यंत साई परिवारात आश्रय मिळतो. अशा ४ मुलींची लग्ने विशालने लावली आहेत. आजही त्यांच्या परिवारात ७ मुली आहेत. अंकिता मुलींना शिवणकामाचे धडे देतात. तसेच त्यांचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय आहे. त्यातही त्या मुलींना प्रशिक्षित करून घेतात. जेणेकरून पुढील आयुष्यात त्यांना कुणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही.
विशाल यांचा स्वतःचा टेम्पो होता. त्यावरून त्यांच्या संपूर्ण परिवाराचा चरितार्थ चालत होता. परंतु कोविडच्या पहिल्या लाटेत त्यांना आपला टेम्पो विकावा लागला. आता तो गाडी भाड्यावर घेऊन आपले व कुटुंबाचे पालनपोषण करत आहे. त्याचबरोबर मुली व अंकिता आपले शिवणकाम व ब्युटीपार्लर चालवून संसाराला हातभार लावत असतात. त्यांना किराणा मालासाठी महिन्याला साधारण २० ते २२ हजार रुपये इतका खर्च येतो. त्याव्यतिरिक्त वेगळे खर्च आहेतच. आता समाजातील काही लोकांनी विशाल यांचे काम पाहून, त्यांना मदतीचे हात पुढे केले आहेत. परंतु ही मदत पुरेशी नाही. लोकं मदत म्हणून कपडेही पाठवतात, परंतु काही वेळा लोकांनी पाठवलेले कपडे इतक्या वाईट अवस्थेत असतात की, त्यांची पायपुसणीसुद्धा शिवता येत नाहीत. पण परुळेकर दाम्पत्य तेही फुकट घालवत नाहीत. त्या कपड्यांच्या पिशव्या शिवून विकल्या जातात. मग त्या दिवशी मुलांना भेळ मिळते.
दिवाळीत पणत्या केल्या जातात, संक्रांतीला पतंग केले जातात, कंदील बनवले जातात, ग्रीटिंग कार्ड्स तयार केली जातात. अभ्यास सांभाळून मुलांनी हे सर्व करायचं, हे त्यांना शिकवलं गेलं आहे. काही मुलांना छान गाता येतं, अशी मुलं कीर्तन करतात. गावातून त्यांना कीर्तनासाठी आमंत्रण मिळतं. ढोलक, चिपळ्या, झांजा घेऊन १० वर्षांची ही मुलं आत्मविश्वासानं कीर्तन करतात. कीर्तनकार सातारकर यांनी या चिमुरड्यांचं कीर्तन ऐकलं आणि ‘मृदंगमणी’ अशी उपाधी १४ वर्षांच्या हेमंतला बहाल केली होती. ही सगळी मुलं मिळून पथनाट्यही करतात. त्यात एक निरोप असतो, ‘आत्महत्या करू नका, बा..’ त्याने काहीही साध्य होणार नाही. मुलं पोरकी होतात, संसार उद्ध्वस्त तर होतात. आत्महत्या करण्यात कोणतीही वीरता नाही. परिस्थितीशी दोन हात करण्यात खरी वीरता आहे.’
आपल्या वाट्याला जे दुःख आलं, ते इतरांच्या वाट्याला येऊ नये, असं वाटणारे लोक हाताच्या बोटांवर मोजण्याइतके असतात. अशाच अत्यल्प व्यक्तींमध्ये समावेश होतो-विशाल परुळेकरचा. लहानपणी विशालला जे दारिद्र्यमय, अनाथासारखं जीवन जगावं लागलं, ते अन्य कुणाला जगावं लागू नये म्हणून विशाल आज अनाथांना, आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आधार देतो आहे. विशालच्या विशाल मनाचं थक्क करणारं दर्शन या उपक्रमातून घडत आहे.
joshishibani@yahoo. com