Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीCM Eknath Shinde : मर्यादा पाळा नाहीतर सर्व उघड करेन, मग तोंड...

CM Eknath Shinde : मर्यादा पाळा नाहीतर सर्व उघड करेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही!

बाप एक नंबरी तर बेटा दस नंबरी

एकनाथ शिंदे यांची ठाकरे पिता पुत्रावर बोचरी टीका

हिंगोली : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना अनेक नेते विरोधकांवर जोरदार हल्लाबोल व टीका करत आहेत. आज हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील सभेत उपस्थित होते. या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे पिता पुत्रावर चांगलाच निशाणा साधला. म्हणींचा वापर करत त्यांनी विरोधकांवर बोचरी टीका केली.

बाप एक नंबरी, बेटा दस नंबरी

महाविकास आघाडीने ४ सिंचन प्रकल्प मंजूर केले, तर आपण १२२ सिंचन प्रकल्प मंजूर केले आहेत. महाविकास आघाडीचा ६० वर्षात गरिबी हटाव असा नारा होता. मात्र, गरिबी हटली नाही. पण, मोदी सरकारने २५ कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणलं आहे, असे शिंदे यांनी सांगितलं. समोरच्या लोकांकडे मुद्दे नाहीत, ते भ्रमिष्ठ झाले आहेत, ‘बाप एक नंबरी अन् बेटा दस नंबरी’ असे म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली. तसेच सरकार पडणार असे म्हणणाऱ्यांना खरा ज्योतिष मिळाला नाही, असे म्हणत संजय राऊतांवरही त्यांनी निशाणा साधला. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, म्हणूनच निवडणुकीत बाबुराव कदम विरोधकांच्या नाकावर टिचून जिंकणार, असेही शिंदेंनी यावेळी म्हटले.

मर्यादा पाळा नाहीतर सर्व समोर आणेन

आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे की, ‘जनतेला माहीत आहे एकनाथ शिंदे कोण आणि माझी काय कमाई आहे. कोणी तरी म्हटले खोके नाही कंटेनर लागतात, कंटेनर कुठे गेले तेही माहीत आहे. दोन वर्षानंतर हा शोध लावला. खोके मोजल्याशिवाय झोप येत नाही ते आमच्यावर आरोप करत आहेत. मला जास्त बोलायला भाग पाडू नये. लंडन ते लखनऊ, खोके ते कंटेनर ठाकरेंच्या सर्व प्रकरणाची सर्व कागदपत्र आहेत. मर्यादा पाळा नाहीतर सर्व समोर आणेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही,” असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

जब तक सूरज चांद रहेगा, तोपर्यंत संविधान राहील

मोदी सरकार आल्यास संविधान बदलले जाणार अशा थापा विरोधक मारत आहेत, पण मोदीजीनीं सांगितलं की, जब तक सूरज चांद रहेगा, तोपर्यंत संविधान राहील, असेही शिंदेंनी म्हटले. घरात बसून सरकार चालवता येत का?, फेसबुक लाईव्ह वरून सरकार चालवता येत नाही, असेही शिंदे यांनी सभेत म्हटले.

मराठा आरक्षण गेले अनेक वर्ष ज्यांच्या हातात होतं, त्यांनी ते दिलं नाही. याउलट मराठा मुक मोर्चा म्हणून टिंगल केली गेली. आरक्षण टिकू नये म्हणून महाविकास आघाडी कोर्टात गेली. पण, आमचं सरकार हे आरक्षण टिकवून दाखवणार. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम हे सरकार करणार आहे. मराठा आरक्षणासाठी मी शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती, ती पूर्ण केल्याचेही शिंदेंनी यावेळी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -