आपला हात जगन्नाथ: कविता आणि काव्यकोडी

आपला हात जगन्नाथ


दीनदुबळ्यांना नेहमीच ,
मदतीचा हात द्यावा.
माणुसकी जपेल त्याला,
मनापासुनी हात जोडावा.


ऊतू नये, मातू नये
हात आखडुनी खर्च करावा.
कामधाम करतेवेळी
भरभर आपला हात चालावा.


चूक झाल्यास कबूल करावी,
हात झटकुनी का बसावे ?
तुरी हातावरी देईल त्याच्या,
हात धुऊन पाठीस लागावे.


संकट धावून आले जरीही ,
हातपाय गाळू नये.
संकटाशी दोन हात करावे,
संकटापुढे हात टेकू नये... !


दुसऱ्यांच्या कष्टास जाणावे ,
आडवाsss हात त्यावर
मारू नये
हातापाया पडुनी कधीही
फायदा स्वतःचा साधू नये


उगारण्यासाठी नाही बरं,
उभारण्यासाठी आहेत हात.
ध्यानात ठेवावे आयुष्यात
आपला हातच जगन्नाथ...!



काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) कधी निर्लज्जपणे हसून
हे आपले विचकतात
चूक दाखवून अनेकांचे
घशात देखील घालतात


विनंती करण्यासाठी
याच्याच कण्या करतात
चीड व्यक्त करण्यासाठी
ओठांसोबत काय खातात?


२) काटकसर करण्यासाठी
यालाच चिमटा घेतो
क्षमा करून अनेकांचे
अपराधी यात घालतो


माया करण्यासाठी
याच्याच जवळ धरतात
खूप खूप भूक लागली की
कावळे कोठे ओरडतात?


३) डबघाईला येणे म्हणजे
कुठपर्यंत बुडणे?
मोठमोठ्याने रडणे म्हणजे
काय बरं काढणे ?


आवडता होणे म्हणजे
कुठला ताईत होतात?
वरकरणी प्रेम दाखवून
केसाने काय कापतात?



उत्तर -


१)गळा
२) पोट
३)दात

Comments
Add Comment

विकतची किर्ती नको

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला प्रसिद्धी, मान-सन्मान आणि किर्ती हवी

उंदराचे बीळ!

कथा-रमेश तांबे एका गावात एक उंदीर अगदी मजेत राहात होता. त्याच्या कुटुंबात चार-पाच जण होते. पण गावात स्वच्छतेच्या

समुद्रात मोती कसे बनतात ?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील सुहलीला गेलेल्या मुलांच्या ज्ञानाच्या गप्पा मस्त चालू होत्या. “सागरी प्रवाह कसे

असा ऋतू

गड-किल्ले हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण. शाळेत असताना पहिल्यांदा पहिला गड पाहिला तो ‘रायगड’ तोही सहलीच्या

एकेकाचे स्वभाव

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर मानुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजात वावरताना आपल्याला विविध स्वभावाची

समुद्र कसे निर्माण झाले?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील शिवम व त्याचे सवंगडी सहलीला गेले असताना दुपारचे जेवण झाल्यावर विश्रांती घेत बसले