आपला हात जगन्नाथ: कविता आणि काव्यकोडी

आपला हात जगन्नाथ


दीनदुबळ्यांना नेहमीच ,
मदतीचा हात द्यावा.
माणुसकी जपेल त्याला,
मनापासुनी हात जोडावा.


ऊतू नये, मातू नये
हात आखडुनी खर्च करावा.
कामधाम करतेवेळी
भरभर आपला हात चालावा.


चूक झाल्यास कबूल करावी,
हात झटकुनी का बसावे ?
तुरी हातावरी देईल त्याच्या,
हात धुऊन पाठीस लागावे.


संकट धावून आले जरीही ,
हातपाय गाळू नये.
संकटाशी दोन हात करावे,
संकटापुढे हात टेकू नये... !


दुसऱ्यांच्या कष्टास जाणावे ,
आडवाsss हात त्यावर
मारू नये
हातापाया पडुनी कधीही
फायदा स्वतःचा साधू नये


उगारण्यासाठी नाही बरं,
उभारण्यासाठी आहेत हात.
ध्यानात ठेवावे आयुष्यात
आपला हातच जगन्नाथ...!



काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) कधी निर्लज्जपणे हसून
हे आपले विचकतात
चूक दाखवून अनेकांचे
घशात देखील घालतात


विनंती करण्यासाठी
याच्याच कण्या करतात
चीड व्यक्त करण्यासाठी
ओठांसोबत काय खातात?


२) काटकसर करण्यासाठी
यालाच चिमटा घेतो
क्षमा करून अनेकांचे
अपराधी यात घालतो


माया करण्यासाठी
याच्याच जवळ धरतात
खूप खूप भूक लागली की
कावळे कोठे ओरडतात?


३) डबघाईला येणे म्हणजे
कुठपर्यंत बुडणे?
मोठमोठ्याने रडणे म्हणजे
काय बरं काढणे ?


आवडता होणे म्हणजे
कुठला ताईत होतात?
वरकरणी प्रेम दाखवून
केसाने काय कापतात?



उत्तर -


१)गळा
२) पोट
३)दात

Comments
Add Comment

खरे धाडस

कथा : रमेश तांबे पावसाळ्याचे दिवस होते. भरपूर पाऊस पडत होता. ओढे-नाले-नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सारे जंगल

बोलल्याप्रमाणे वागावे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर “माणसाला त्याच्या बोलण्यावरून नव्हे तर कृतीवरून ओळखले जाते” असे आपण

मनाचा मोठेपणा

कथा : रमेश तांबे शाळेत भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्याधरने नेहमीप्रमाणे आपले नाव स्पर्धेसाठी दिले होते.

सहकार्य

कथा : प्रा. देवबा पाटील आदित्यने आधीपासूनच सुभाषला काहीतरी मदत करण्याचा आपल्या मनाशी ठाम निश्चय केलेला होताच.

प्रार्थना

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, अध्यात्मिक, कला-क्रीडा अशा संस्थांमध्ये

फुलासंगे मातीस वास लागे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर माणसाच्या आयुष्यात संगतीचे महत्त्व फार मोठे असते. एखाद्या व्यक्तीचा