Friday, July 12, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यDr. B. R. Ambedkar: बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनामध्ये काशीबाईंचे योगदान

Dr. B. R. Ambedkar: बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनामध्ये काशीबाईंचे योगदान

रवींद्र तांबे

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलित उद्धारासाठी व मानवमुक्तीच्या संघर्षासाठी अनेक व्यक्तींनी आपापल्या आर्थिक व सामाजिक क्षमतेनुसार योगदान दिले आहे. त्यात आता तळेगावच्या काशीबाई गायकवाड यांचे नाव पुढे येत आहे. काशीबाई गायकवाड यांच्याविषयी लोकांना फारशी माहिती नसून ही माहिती अधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न.

१४ एप्रिल हा दिवस महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. देशात तसेच परदेशामध्ये सुद्धा हा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या तळेगावच्या बंगल्यात आल्यावर त्यांच्या आवडीचे जेवण बनविणाऱ्या व त्यांना आनंदाने जेवण देणाऱ्या काशीबाई दत्तात्रय गायकवाड यांनी पहाटे ३ च्या सुमारास वयाच्या ९६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एकीकडे आंबेडकरी जनता बाबासाहेबांच्या जयंती महोत्सवात तल्लीन असताना हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांना काशीबाईंचे योगदान माहिती असले तरी त्यांनी केलेले कार्य खऱ्या अर्थाने आज इतिहासजमा झाले आहे असेच म्हणावे लागेल.

काशीबाई गायकवाड यांचा जन्म ७ एप्रिल १९२९ रोजी झाला. त्यांनी ७ एप्रिल, २०२४ रोजी ९६ व्या वर्षांत पदार्पण केले होते. तसा त्यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला. बरोबर ७ दिवसांनी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्यावर १४ एप्रिल २०२४ रोजी तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आज जरी आपल्यात त्या नसल्या तरी आपल्या आयुष्यात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तळेगावच्या बंगल्यात आल्यावर स्वत: जेवण तयार करून आपल्या हातानी पितळेच्या भांड्यात गरमा गरम जेवण वाढणाऱ्या काशीबाई गायकवाड अशी त्यांनी आपली आज ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांचा आदर्श आजच्या तरुण पिढींनी घेतला पाहिजे. कारण तो काळ म्हणजे, नुकतेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. त्यामुळे आज निश्चितच त्यांच्या मुलांना, नातवंडे, पतवंडे आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना त्यांचा सार्थ अभिमान वाटत असेल.

कारण काशीबाईंचे कार्य म्हणजे आपल्या भारत देशाच्या इतिहासामधील अभूतपूर्व घटना आहे. असे असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तळेगावच्या बंगल्यावर आल्यावर आवाज देत असत. बेटा काशीबाई, “आज काय बेत केलाय आमच्यासाठी” असा आवाज कानी पडताच तयार केलेले आरतीचे ताट घेऊन काशीबाई बाबासाहेबांना ओवाळणी करायच्या. नंतर जेवण बनवून बाबासाहेबांना जेवण वाढायच्या. तेव्हा ज्या काशीबाई गायकवाड यांच्या आठवणी आहेत त्याचे आत्मपरीक्षण आजच्या तरुण पिढीने करणे गरजेचे आहे.

काशीबाई गायकवाड यांचे लग्न मावळ तालुक्यामधील धामणे गावचे रहिवासी दत्तात्रय गायकवाड यांच्याबरोबर झाले. त्या काळी गायकवाड हे घराणे श्रीमंत होते. तसेच दत्तात्रय गायकवाड यांचे वडील लिंबाजी गायकवाड हे मोठे कंत्राटदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. दत्तात्रय गायकवाड यांचे वडील मावळ तालुक्याच्या परिसरातील जंगल विकत घ्यायचे. त्यामधील जुनी झालेली झाडे कातकर बांधवांकडून तोडून घ्यायचे. त्यानंतर तोडलेली लाकडे जाळून त्याचा कोळसा तयार करून तो मुंबई शहरात पाठवत असत. तसेच त्याच्या जोडीला ज्वारीची ताटे जमा करून मुंबईला पाठवायचे.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षण देण्यासाठी ८ जुलै १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटीची’ स्थापना केली. त्यानंतर औरंगाबाद येथे सोसायटीची एक संस्था सुरू केली. हे जरी शहरातील असले तरी त्यानंतर ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षण सुरू करण्यासाठी लिंबाजी गायकवाड यांना लोणावळा येथे भेटण्यासाठी पाचारण केले. तशी त्यांची लोणावळ्यात भेट होऊन आपले कार्य सुरू करण्यासाठी बाबासाहेबांनी आवाहन केले. त्यानंतर लिंबाजी गायकवाड यांनी तळेगाव येथील हर्नेश्वर टेकडीच्या दक्षिणेला असलेली जागा आपल्या प्रयत्नाने मिळविली. त्यानंतर तेथे दोन विहिरी खोदल्या. नंतर १९४८ साली बंगला बांधला. बाबासाहेब मुंबईमधून पुणे किंवा सोलापूरला जात असत तेव्हा या बंगल्यावर येत असत. त्या आधी आदल्या दिवशी बाबासाहेब येत असल्याची खबर तहसील कार्यालयातील अंमलदार बंगल्यावर येऊन सांगत असे. त्यानंतर गायकवाड दाम्पत्य तयारीला लागायचे. पहिला बंगला स्वच्छ करून घेत असत.

त्यानंतर वाण्याकडून टपकल बाजरी आणायचे. घरातील जात्यावर दळून हातावर थापलेली आणि चुलीवर भाजलेली बाजरीची भाकरी बाबासाहेब आवडीने खात असत. तसेच भाकरी सोबत मेथीची भाजी, मूग डाळीचे वरण, शेंगदाणा चटणी, जवस चटणी, तिळाची चटणी हे सुद्धा आवडीने खायचे. महत्त्वाची बाब म्हणजे काशीबाईंनी सुक्या बोंबलाची केलेली चटणी बाबासाहेब आवडीने खात असत. म्हणजे त्याकाळी काशीबाई या सुगरण गृहिणी होत्या. अशा महान व्यक्तीला आपल्या हातावर थापलेली भाकरी देणे हे महान कार्य काशीबाईंनी केलेले आहे. विशेष म्हणजे जेवणाला वापरणाऱ्या भांड्यांची सुद्धा त्या काळजी घेत असत.

काशीबाई यांचा मुलगा बृहस्पती सांगतात की, बाबासाहेब तळेगावच्या बंगल्यावर ४८ वेळा आले होते. त्यावेळी त्यांची जेवण खाण्याची व्यवस्था आपल्या आईने घेतली होती. तेव्हा त्या काळी काशीबाई गायकवाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तळेगावच्या बंगल्यावर आनंदाने जेवण करून जेवण घालण्याचे काम नवीन पिढीला प्रेरणा देणारे आहे. अशा या रुचकर जेवण बनविणाऱ्या काशीबाई गायकवाड यांना कडक निळा सलाम.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -