दुबई विमानतळ पाण्याखाली तर ओमानमध्ये १८ जणांचा मृत्यू
यूएई : संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये काल वर्षभराचा पाऊस एकदाच आल्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे अनेक शहरे ठप्प झाली आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्याखाली गेले आहे. इथल्या रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. इतकेच नाही तर शेजारील ओमानमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
दुबई विमानतळावर काल अवघ्या बारा तासात सुमारे १०० मिमी पावसाची नोंद झाली. २४ तासात एकूण १६० मिमी पाऊस पडला. एकाच दिवसात अधिक प्रमाणात पाऊस पडल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली आहे. पावसामुळे आलेल्या पुराचा दुबईच्या वाहतुकीवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतूकही विस्कळीत झाली आहे. दुबई विमानतळ पाण्याने भरले आहे. याआधी सोमवारी दुबई पोलिसांनी सार्वजनिक सुरक्षा सल्लागार जारी केला होता ज्यात लोकांना खराब हवामानाबद्दल सतर्क केले होते.
बुधवारपर्यंत हवामान खराब राहण्याची शक्यता
रविवारी, १४ एप्रिल आणि सोमवारी, १५ एप्रिल रोजी ओमानच्या विविध भागांमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे किमान १८ लोकांचा मृत्यू झाला, असे देशाच्या राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन समितीने सांगितले. तसेच बुधवार पर्यंत हवामान खराब राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या वर्षीही दुबईत पूर
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही दुबईचे हवामान खराब झाले होते. वादळी पावसामुळे शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की प्रशासनाने लोकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास मनाई केली होती. उष्ण आणि वाळवंटी देशाच्या हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे जगभरातील शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले.