तंत्रमंत्र पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
केसीआर अंधश्रद्धाळू असल्याचा निर्मला सीतारामन यांनी केला होता आरोप
हैदराबाद : तेलंगणाचे (Telangana) माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्याबाबत एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. केसीआर यांच्या घराबाहेर काल कोणीतरी काळी जादू (Black Magic) केल्याचे आढळून आले. काल हैदराबादमधील (Hyderabad) बंजारा हिल्सच्या नंदी नगर भागात के. चंद्रशेखर राव यांच्या घराबाहेर लोकांचा जमाव जमला होता. त्यांच्या घराजवळील रिकाम्या प्लॉटमध्ये कोणीतरी तंत्रक्रिया केली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी लोकांना लिंबू, कुंकू, हळद, बाहुल्या आणि इतर वस्तू प्लॉटमध्ये विखुरलेल्या दिसल्या. या सर्व वस्तू तांत्रिक विधींमध्ये वापरल्या जातात. यानंतर केसीआर यांच्या घराबाहेर जादूटोणा होत असल्याची बातमी परिसरात वणव्यासारखी पसरली. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्लॉटमध्ये विखुरलेल्या वस्तू गोळा केल्या.
जादूटोणा झाल्याची अद्याप पुष्टी झाली नसली तरी, पोलीस प्लॉटमध्ये सापडलेल्या वस्तूंचा तपास करत आहेत. रिकाम्या प्लॉटमध्ये कोणीतरी तंत्रक्रिया करून वस्तू तेथेच टाकून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Reports of someone performing some #BlackMagic rituals near home of former #TelanganaCM #KCR in #Hyderabad; who performed, who/ what it targetted is not known pic.twitter.com/Od1SmZGVQI
— Siraj Noorani (@sirajnoorani) April 16, 2024
केसीआर अंधश्रद्धाळू असल्याचा निर्मला सीतारामन यांचा आरोप
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी के चंद्रशेखर राव यांच्यावर आरोप केले होते. निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की, केसीआर ज्योतिष, अंकशास्त्र आणि तांत्रिक कार्यांवर विश्वास ठेवतात. ते इतके अंधश्रद्धाळू आहेत की ते कधीच राज्य सचिवालयात पाऊल ठेवत नाहीत. ते महिलांना त्यांच्या मंत्रिमंडळात घेत नाहीत. तांत्रिकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पक्षाचे नाव बदलले होते. त्यांच्या पक्षाचे नाव तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) होते, परंतु आता पक्षाचे नाव भारतीय राष्ट्र समिती (BRS) आहे.
केसीआर यांच्या फार्महाऊसमध्ये पाळीव काळी मांजर
के चंद्रशेखर राव यांच्यावर जादूटोण्यावर विश्वास ठेवण्याचा आणि ते केल्याचा आरोप आहे. २०२२ साली तेलंगणामध्ये भाजपचे अध्यक्ष असलेले संजय यांनी आरोप केला होता की, चंद्रशेखर राव यांना जादूची शक्ती मिळवायची होती. त्यांनी आपल्या फार्म हाऊसमध्ये काळी मांजर पाळली आहे. त्यांच्या माहितीदारांनी आपल्याला ही माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला होता.