Monday, July 15, 2024
Homeमहत्वाची बातमीMVA Seat allocation : जागावाटप ठरल्यानंतरही काँग्रेसच्या गोटात नाराजी! 'हे' बंडखोरीचे संकेत?

MVA Seat allocation : जागावाटप ठरल्यानंतरही काँग्रेसच्या गोटात नाराजी! ‘हे’ बंडखोरीचे संकेत?

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी जाहीरपणे व्यक्त केली मनातील खदखद

सांगलीत काँग्रेस भवनबाहेर शुकशुकाट

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सांगली (Sangli) आणि भिवंडीच्या (Bhiwandi) जागेवरुन गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) सुरु असलेली धुसफूस सर्वश्रुत आहे. याबाबत स्पष्टता देण्यासाठी व जागावाटपाचा फॉर्म्युला सांगण्यासाठी मविआने आज एकत्रित पत्रकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेत ठाकरे गट २१ (Thackeray Group), काँग्रेस १७ (Congress) तर शरद पवार गट १० (Sharad Pawar Group) जागा लढवणार असल्याचे सांगण्यात आले. त्यातील वादग्रस्त सांगलीची जागा ही ठाकरे गटाकडेच तर भिवंडीची जागा ही शरद पवार गटाकडेच राहणार आहे, त्यामुळे परिषदेनंतरही काँग्रेसच्या गोटात कमालीची नाराजी पसरली असल्याचे चित्र आहे.

आज मविआची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर काँग्रेस नेते काही न बोलताच निघून गेले. त्यांच्या चेहर्‍यावर नाराजी स्पष्टपणे दिसून आली. तर दुसरीकडे परिषदेनंतर मविआचे तीन प्रमुख नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), नाना पटोले (Nana Patole) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे परिषद घेतल्यानंतरही मुख्य नेत्यांमध्येच समन्वय नाही की काय, असा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. ‘काँग्रेस पक्षाला मुंबईत समाधानकारक जागा मिळालेल्या नाहीत. ज्या जागांवर आम्ही निवडून येऊ शकतो, त्या जागा आम्हाला मिळालेल्या नाहीत’, असं काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचं मत आहे. तसेच, ज्या जागांवर आमची ताकद नाही, अशा जागा देण्यात आल्याची नाराजीही काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

सांगलीचा वाद चिघळला? काँग्रेस नेते विश्वजीत कदम, विशाल पाटील नॉट रिचेबल

सांगलीमध्ये ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हेच निवडणूक लढवणार आहेत, त्यामुळे काँग्रेसच्या गोटात शांतता पसरली आहे. सांगलीच्या काँग्रेस भवन आणि विशाल पाटील यांच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या विशाल पाटलांनी वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. एकिकडे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील नॉटरिचेबल असताना दुसरीकडे सांगलीतील काँग्रेसचे कार्यकर्तेही नाराज झाले आहे. विशाल पाटलांच्या समर्थकांनी ‘आमचं काय चुकलं? आता जनतेच्या कोर्टात लढायचं’ असं लिहिलं असून विशाल पाटील यांचा हात जोडतानाचा उभा फोटो पोस्ट केला आहे.

महाविकास आघाडीच्या निर्णयावर सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांची उद्या बैठक होणार आहे. विश्वजीत कदम, विशाल पाटील, विक्रम सावंत, जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील आदी प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चर्चेनंतर पुढचा निर्णय घेतला जाईल असं शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलं. मात्र अंतिम निर्णय विशाल पाटील घेतील. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, केवळ सांगलीच नव्हे तर राज्यभरातील काँग्रेसचे नेते, कार्यक्रर्ते मविआच्या जागावाटपावर नाराज आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनही बंडखोरी केली जाण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -