पुणे : पुण्यासारख्या (Pune news) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरात गुन्हेगारी (Crime) प्रवृत्ती वाढीस लागली आहे. गेल्या काही दिवसांत पुण्यातून अनेक चित्रविचित्र घटना समोर येत आहेत. त्यातच आणखी एका घटनेने खळबळ उडवून दिली आहे. पुण्यातील एका प्रतिष्ठित ऑटोमोबाईल कंपनीला (Automobile Company) पुरवण्यात आलेल्या समोशांमध्ये चक्क कंडोम, गुटखा आणि खडे सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामागचं कारण वाचून तुम्हीही हैराण झाल्यावाचून राहणार नाही.
कॅटलिस्ट सर्व्हिस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्मकडे ऑटोमोबाईल कंपनीच्या कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ पुरविण्याचे कंत्राट आहे. या फर्मने मनोहर एंटरप्रायझेस नावाच्या दुसऱ्या उपकंत्राटदार कंपनीला समोसे पुरवण्याचे कंत्राट दिले होते. शनिवारी ऑटोमोबाईल कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना समोश्यामध्ये कंडोम, गुटखा आणि खडे सापडले.
तपासाअंती आढळून आले की, यापूर्वी एसआरए एंटरप्रायझेस ही कंपनी खाद्यपदार्थ पुरवण्याचे काम करत होती. मात्र, ते पुरवत असलेल्या अन्नामध्ये मलमपट्टी आढळली होती. त्यानंतर कंपनीने त्याचा करार रद्द केला होता व मनोहर एंटरप्रायझेस या कंपनीला कंत्राट दिले होते. या रागातून एसआरए एंटरप्रायझेसने मनोहर एंटरप्रायझेसची बाजारातील प्रतिष्ठा खराब कराण्यासाठी हे कृत्य केले.
नेमकी कशी केली भेसळ?
या प्रकरणी मनोहर एंटरप्रायझेसच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतर, असे समोर आले की फिरोझ शेख आणि विकी शेख या दोन कर्मचाऱ्यांनी समोश्यामध्ये कंडोम, गुटखा आणि खडे भरले होते. या दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी कबूल केले की, ते एसआरए एंटरप्रायझेसचे कर्मचारी आहेत आणि त्यांच्या भागीदारांनी मनोहर एंटरप्रायझेस पुरवठा करत असलेल्या अन्नात भेसळ करण्यासाठी पाठवले होते, अशी माहिती चिखली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली.
भेसळ केलेल्या समोशांप्रकरणी पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एसआरए कंपनीच्या फिरोझ शेख आणि विकी शेख या दोन कामगारांचा समावेश आहे. या घटनेची गंभीर दखल घेत विषाद्वारे दुखापत करणे आणि गुन्हेगारी कट रचणे या कलमांतर्गत आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.