- गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण
मागील आठवड्यात देखील भारतीय शेअर बाजार हा तेजीत राहिला. या आठवड्यात भारतीय शेअर बाजाराचे लक्ष होते ते रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाकडे. रिझर्व्ह बँक ही बँकांना जे कर्ज देते आणि त्या दिलेल्या कर्जाला जे व्याजदर लावते त्याला “रेपो दर”असे म्हणतात. तर बँका रिझर्व्ह बँकेकडे ज्या ठेवी ठेवतात त्या ठेवींवर बँकांना जो परतावा मिळतो त्याला “रिव्हर्स रेपो दर” असे म्हणतात. रिझर्व्ह बँकेने या चालू वर्षातील पहिले पतधोरण मागील आठवड्यात जाहीर केले. पतधोरण निश्चिती समितीने व्याज दर “जैसे थे” ठेवत कर्जदारांना अनपेक्षित पण सुखद धक्का दिला. त्यांनी “रेपो दरात” कोणतीही कपात केली नाही. तो ६.५ टक्के असाच कायम ठेवण्यात आला. पतधोरण जाहीर झाल्यानंतर शेअर बाजाराने या पतधोरणानंतर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. पतधोरण सकाळी १० वाजता जाहीर होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही काळासाठी शेअर बाजाराच्या निर्देशांकात थोडी घसरण झाली. पतधोरण जाहीर झाल्यानंतर निर्देशांक निफ्टीमध्ये वाढ दिसून आली. पतधोरणाच्या निर्णयाबाबत संवेदनशील असणारी क्षेत्र म्हणजे बँक, वाहन उद्योग, वित्तीय संस्था यामध्ये देखील पतधोरणानंतर वाढ दिसून आली. अलीकडेच्या काळात “रेपो दरात” रिझर्व्ह बँकेकडून जी कपात केली गेली. त्या तुलनेत बँकांकडून मात्र कर्जावरील व्याजाच्या दरात तेवढ्या प्रमाणात म्हणावी तशी कपात झालेली नाही. तरी अजून बँकाच्या कडून कर्ज स्वस्त होऊ शकतात. यासाठी मात्र बँकांनी पावले उचलणे गरजेचे असेल.
पुढील आठवड्याचा विचारकरता शेअर बाजाराची दिशा ही तेजीची आहे. त्यामुळे निर्देशांक तेजीत असले तरी टेक्निकल बाबींकडे पाहता निर्देशांक वरील धोकादायक पातळीच्या जवळ आलेले आहेत. त्यामुळे यापुढे निर्देशांक “पूल बॅक” देणे अपेक्षित आहे. पुढील आठवड्यासाठी अल्पमुदतीच्या चार्टनुसार “निफ्टी” २१९५० आणि “बँकनिफ्टी” ४६५०० ह्या प्रत्येक निर्देशांकाच्या अत्यंत महत्त्वाच्या पातळ्या आहेत. या पातळ्या जर तुटल्या तर निर्देशांकाच्या तेजीला लगाम लागेल. त्यामुळे पुढील आठवड्यासाठी शेअर्स खरेदी किंवा विक्री करीत असताना निर्देशांकावरील अत्यंत महत्त्वाच्या पातळ्या लक्षात ठेवूनच व्यवहार करणे आवश्यक आहे. टेक्निकल अॅनालीसीसनुसार स्पार्क, अपार इंडस्ट्रीज, झोमॅटो, वोल्टास यासह अनेक शेअर्सची दिशा ही तेजीची आहे. कमोडीटी मार्केटचा विचारकरता सोने आणि चांदी यांची दिशा ही तेजीचीच असून जोपर्यंत सोने ६७८०० च्या वर आहे, तोपर्यंत सोन्यातील तेजी कायम राहील. त्यामुळे सोन्यामध्ये तेजीचा व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. त्याचवेळी करन्सी मार्केटमध्ये डॉलरने देखील ८३.५० ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडलेली आहे. त्यामुळे पुढील काळाचा विचारकरता डॉलरमध्ये आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. जोपर्यंत डॉलर ८२.५० च्या खाली जाणार नाही तोपर्यंत डॉलरमधील तेजी कायम राहील. या काही आठवड्यात कच्च्या तेलात वाढ झालेली आहे. आता जोपर्यंत कच्चे तेल ६९०० च्या वर आहे, तोपर्यंत कच्च्या तेलातील तेजी कायम राहील.
(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही.)