- प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
वाढत्या वयात, गरीब परिस्थितीमुळे, घरात कोणत्याही प्रकारचे अन्न नसल्यामुळे अनेकांना ‘कोरडा पाव’ खावा लागतो. त्यामुळे सुग्रास भोजन असूनही शरीर प्रकृतीमुळे ‘कोरडा पाव’ खावे लागते. शेवटी म्हणतात ना, ‘चना है तो दात नहीं और दात है तो चना नहीं.’ म्हणूनच योग्य वेळी योग्य अन्न, वस्तू, शिक्षण आदी मिळते आहे का? हे सुज्ञांनी पाहिले पाहिजे.
मी शाळेत असतानाची गोष्ट! माझ्या वर्गात सुधा नावाची मुलगी होती. सातवीपर्यंत म्युनिसिपल शाळेत शिकून आठवीत ती आमच्या शाळेत आली होती. उंचीने थोडी कमी असल्यामुळे तिला पहिल्या बेंचवर बसवले गेले. वर्गामध्ये पंधरा-वीस मुली होत्या. सुधा सारख्याच आणखी दोन मुली आठवीत आमच्या शाळेत आल्या होत्या. काही दिवसांतच आमच्यात मिसळून गेल्या. पीटीच्या तासाला वगैरे जिथे आम्ही खूप गप्पा करायचो आणि धुडगूस घालायचो तिथेही ती आमच्या सोबत फारशी बोलायची नाही, मनापासून मिसळायची नाही.
आम्हाला वाटायचे, ठीक आहे, कमी बोलणारी आहे. मधल्या सुट्टीत आम्ही दोन-चार ग्रुप करून डबा खायचो. आमच्यापैकी सगळ्याच ग्रुपनेही तिला खूपदा डबा खाण्यासाठी बोलवले. पण ती कधी आली नाही. नाही बोलायला आवडतं तर ठीक आहे पण सोबत डबा खायला यायला काय हरकत आहे? पण शेवटपर्यंत प्रयत्न करूनही ती कोणत्याच ग्रुपमध्ये मिसळली नाही. ती स्वतःचा डबा खिडकीच्या बाजूला ठेवून आम्हा सगळ्यांकडे पाठ करून स्वतःच्या बेंचवर बसून एकटीच डबा खायची. एक दिवस माझ्या लक्षात आले की, तिच्या डब्यात रोज फक्त एक कोरडा पाव असायचा, ज्याला तूप-साखरसुद्धा लावलेले नसायचे. साहजिकच तिला तो डबा कोणालाही दाखवायला आवडला नसता. तिच्याविषयी कोणी सहानुभूती दाखवू नये किंवा तिच्या गरिबीची चेष्टा करू नये या उद्देशाने ती आमच्यासोबत डबा खायची नाही, हे माझ्या लक्षात आले. या घटनेला तीन-चार शतके उलटून गेली तरी माझ्या डोक्यातून ‘कोरडा पाव’ काही जात नाही.
मी कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट. आई मला भाजी-पोळीचा डबा द्यायची. माझ्या शेजारी एक मैत्रीण बसायची ती म्हणायची, “तुझी आई खूपच चवदार भाजी बनवते, मला ती कधी खाईन असे होते.”
ती नेहमीच मी वर्गात गेले की माझ्या बॅगेतून डबा काढून मांडीवर ठेवून कॉलेजमध्ये तास सुरू असतानासुद्धा व्यवस्थित डबा खायची. माझ्या स्वभावानुसार मी कधी तिला ‘माझा डबा खाऊ नकोस’, असे म्हटले नाही. मधल्या सुट्टीत ती दोन वडापाव घेऊन यायची. (आमच्या कॉलेजच्या आवारात जो वडापाव मिळायचा तो पाव कोरडा असायचा. चटणीमुळे विद्यार्थ्यांना काही इन्फेक्शन होऊ नये, म्हणून कदाचित ते कोणत्याही प्रकारची चटणी त्या विक्रेत्याला लावू देत नसावेत, असे वाटते.) दोन वडापावपैकी एक ती मला द्यायची आणि एक ती स्वतः खायची. वडापाव हा पोळीभाजीपेक्षा नक्कीच जास्त चवदार लागायचा; परंतु त्याने माझे पोट भरायचे नाही. मग मी माझ्या आईला दोन डबे भरून द्यायला सांगितले. आई नोकरी करायची तरीही तिने विनातक्रार मला दोन डबे भरून द्यायला सुरुवात केली. खरंतर ही मुलगी अतिश्रीमंत होती. घरात खाण्यापिण्याची ददात नव्हती. ती आलिशान गाडीतून यायची. ड्रायव्हर तिची बॅग उचलून कॉलेजच्या गेटपर्यंत आणून द्यायचा आणि मग ती आत यायची. मी विचार करायचे की तिच्या घरात नक्कीच स्वयंपाकीण असणार तरीसुद्धा ती असा माझा रोज डबा कशी काय खाऊ शिकते? बरं तिला माझा डबा खायला आवडतो आणि ती खाते हेही ठीक आहे; परंतु ती डबा घरातून का आणत नाही? तो डबा तिने हवा तर मला देऊन टाकायचा. तिचे रोज वडापाव खाणे मला आणि आमच्या बरोबरीच्या सर्वच मैत्रिणींना खटकायचे. ‘पाव’ हा पदार्थ जगभरातील अनेकांचा आवडीचा पदार्थ आहे. पावाच्या सोबतीने अनेक पदार्थ खाल्ले जातात आणि पाव वापरून सुद्धा अनेक पदार्थ बनवले जातात. पावाला पर्याय नाही.
आता अलीकडे असेच एका अति श्रीमंत मैत्रिणीने नाश्त्यासाठी घरी बोलवले होते. तिच्या घरी गेले तेव्हा डायनिंग टेबलावर असंख्य पदार्थांची रेलचेल होती. ती, तिचा नवरा, तिची मुले यांच्यासोबत मी नाश्ता करायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आले की, कोपऱ्यात बसलेले तिचे सासरे एक कोरडा पाव खात आहेत. मला गलबलून आले. बोलू की नको, या विचारात मी होते. कदाचित माझ्या चेहऱ्यावरचे भाव त्यांच्या लक्षात आले असावेत आणि ते पटकन म्हणाले, “मला प्रचंड अॅसिडिटीचा त्रास आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर मी फक्त कोरडा पाव खातो जेणेकरून माझी अॅसिडिटी कमी होते आणि मग माझा दिवस चांगला जातो.”
तर असा हा ‘कोरडा पाव’ अधूनमधून माझ्या आयुष्यात येत गेला. वाढत्या वयात, गरीब परिस्थितीमुळे, घरात कोणत्याही प्रकारचे अन्न नसल्यामुळे ‘कोरडा पाव’ खावे लागणे आणि समोर सर्व प्रकारचे सुग्रास भोजन असूनही शरीर प्रकृतीमुळे ‘कोरडा पाव’ खावे लागणे हे दोन्हीही मनाला अस्वस्थ करून गेले.
शेवटी म्हणतात ना ‘चना है तो दात नहीं और दात है तो चना नहीं.’ म्हणूनच आपल्या आसपास वावरणाऱ्या माणसांना तरी, योग्य वेळी योग्य अन्न, वस्तू, शिक्षण आदी मिळते आहे का? हे सुज्ञांनी पाहिले पाहिजे. ते त्यांना कसे मिळेल, कुठे मिळेल, यासोबतच आपण स्वतः नेमके यासाठी काय करू शकतो याचा कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे!
pratibha.saraph@ gmail.com