मुंबई : आधी स्वतःच्या ताटात वाढून घ्यायचे, ही शिवसेनेची काम करण्याची पद्धत नाही. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी ही आधी देखील जाहीर करता आली असती. या आधी देखील आपण पाहिले की एकाच कुटुंबातील व्यक्ती सरकारचे प्रतिनिधित्व करत होते. तर युवराज हे मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत होते. ही शिवसेनेच्या कामाची पद्धत नाही. आधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी काम करायचे आणि मग स्वतःकडे बघायचे अशी शिवसेनेची पद्धत आहे. शिवसेना कधीच आधी स्वतःच्या ताटात वाढून घेत नाही. अशा शब्दात मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव आज जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला.
श्रीकांत शिंदे यांचे मोठ्या प्रमाणात काम आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देणे हे अपेक्षितच होते. श्रीकांत शिंदे हे कल्याण मध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुख नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.