
भाजपा सोडून गेलेल्या उन्मेष पाटलांवर गिरीश महाजनांचे टीकास्त्र
मुंबई : लोकसभेचे (Loksabha) तिकीट मिळाले नाही म्हणून काही दिवसांपूर्वी भाजपात असलेल्या उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी ठाकरे गटात (Thackeray Group) प्रवेश केला. यावेळेस त्यांनी भाजपावर काही आरोप केले. त्यावर आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. 'तुम्ही लढा आणि जिंकून दाखवा. आता जनताही दाखवेल कोण खरं आणि कोण खोटं आहे', असं आव्हान मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे.
गिरीश महाजन म्हणाले, उन्मेष पाटील ठाकरे गटामध्ये गेले असून त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पाटील यांच्या तिकिटाचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाचा होता. भाजपमध्ये आल्यावर त्यांना आमदारकी, खासदारकी आम्ही दिली होती. त्यांनी जाण्याची घाई केली. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे राहिल्याने गेल्याने कोणाला काही फरक पडत नाही, असे महाजन म्हणाले.
पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आपली स्वतःची कबर स्वतः खोदली आहे. महायुतीत असताना आमच्याशी गदारी केली. तुम्ही अल्पशा सुखासाठी दुःखात गेला आहात. तुम्ही तुमची कबर स्वतःच खोदली आहे. तुम्ही लढा आणि जिंकून दाखवा आणि जनता ही आता दाखवेल कोण खरं आणि कोण खोटं आहे, असं आव्हान महाजन यांनी दिलं.
देवेंद्र फडणवीस यांना चांडाळ चौकडीने घेरले आहे, असे उन्मेष पाटील म्हणाले होते. यावर गिरीश महाजन म्हणाले, त्यांनी पक्ष सोडला असून ते आता काहीही टीका करू शकतात. पाटील यांचं तिकीट नाकारण्याची कारणे केंद्रीय नेतृत्वाला माहिती आहेत. मी त्यांना वेळोवेळी सांगितले होते. मी त्यांना समज दिली होती. त्यांच्याशी चर्चा केली होती. ते जर आम्हाला चांडाळ चौकडी म्हणत असतील तर त्यांनी आपलं काय चुकलं म्हणून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा सल्ला महाजन यांनी दिला. उन्मेष पाटील यांनी तिकडे जाऊन फार मोठी चूक केली आहे. आमच्याकडे त्यांना भविष्य होते. त्यांना नंतर कळेल की आपण मोठी चूक केली, असंही महाजन म्हणाले.